मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्या विषयी चुकीची माहिती विकीपीडियाने प्रसारित केली असल्याने विकीपीडियावर आता कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण विकीपीडियावर टाकणा-या लेखकांवर गुन्हा दाखल होणार आहे.
महाराष्ट्र सायबर सेल विकीपीडियावर असलेल्या चार ते पाच लेखकांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विकीपीडिया हे एक ओपन प्लॅटफॉर्म असल्याने काही लोकांना त्यांचे लिखाण त्यावर प्रकाशित करता येतात. सायबर सेलने जवळपास १० ते १५ ईमेल विकीपीडियला पाठवले असून त्यांच्याकडून एकही उत्तर आले नाही. त्यामुळे महाराष्ट्र सायबर सेलने संबंधित लेखकांवर गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्यासाठी अनेकांनी बदनामीकारक लेखन केले आहे. असाच काहीसा प्रकार माहितीचा स्त्रोत म्हणून प्रसिद्ध असलेल्या विकीपीडियावर दिसून आला होता. याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दाखल घेतली आणि योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्राच्या सायबर सेलने मेल पाठवून विकीपीडियाला समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विकीपीडियाने कुठलाही प्रतिसाद न दिल्याने अखेर कारवाई करण्यात येत आहे. छत्रपती संभाजी महाराज म्हणजे थेट सिंहाचा छावा.
शंभूराजेंना १३ पेक्षा जास्त भाषांचे ज्ञान अवगत होते. शस्त्रावर जेवढी पकड तेवढीच शास्त्रावर देखील होते, त्यामुळे ते शास्त्र आणि शस्त्र दोन्हीमध्ये पारंगत होते. बुधभूषण हा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या जिवाची देखील पर्वा केली नाही, अशा या संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक लेख लिहिणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.