23.4 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रमुस्लिम समाज काँग्रेसकडे वळल्याने अकोल्यात पराभव

मुस्लिम समाज काँग्रेसकडे वळल्याने अकोल्यात पराभव

जालना : प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यातील पराभवाचे खापर मुस्लिमांवर फोडले आहे. माझा मतदार असलेला मुस्लिम समाज काँग्रेसकडे वळला. शंभर टक्के व्होट ट्रान्सफर झाली. त्यामुळेच माझा अकोल्यात पराभव झाला, असे विधान प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

दरम्यान, ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. अंतरवाली सराटीच्या वेशीवरील वडीगोद्री गावात हे उपोषण सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या उपोषणकर्त्यांची आज भेट घेतली. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर आंबेडकर यांनी या दोन्ही नेत्यांना पाणी पिण्याची विनंती केली. आंबेडकरांच्या विनंतीला मान देत या दोन्ही नेत्यांनी पाणी घेतले.

पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले, मुस्लिमांनी यावेळी साथ दिली असती तर माझा विजय निश्चित झाला असता, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आंबेडकर यांच्या या दाव्यावर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.

प्रकाश आंबेडकर हे वडीगोद्री येथे आले होते. वडीगोद्रीत ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. प्रकाश आंबेडकर यांनी या दोन्ही उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांना पाणी पिण्याचा आग्रह केला. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना आंबेडकर यांनी आपल्या पराभवाचे विश्लेषण करत मुस्लिम समाजावर खापर फोडले. माझ्याकडचा मुस्लिम मतदार शंभर टक्के काँग्रेसकडे गेला आणि तो १०० टक्के काँग्रेसमध्ये गेल्यामुळे मी पडलो. मला ओबीसींची आणि मागासवर्गीयांची पावणेतीन लाख मते मिळाली. मुस्लिम समाजाची मते माझ्याकडे आली असती तर मी जिंकलो असतो, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकर यांनी आग्रह केल्यानंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी पाणी घेतले. दिवसातून किमान एकवेळा तरी पाणी घ्या, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी दोन्ही नेत्यांना माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांचे उदाहरण दिले. व्ही. पी. सिंग यांनी पाणी घेतले नाही. त्यामुळे त्यांच्या किडनीवर त्याचा परिणाम झाला. म्हणूनच पाणी घ्या आणि उपोषण सुरू ठेवा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR