नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. यावेळीही दिल्लीची निवडणूक एकाच टप्प्यात पूर्ण होणार आहे. विधानसभेच्या सर्व ७० जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. निवडणूक काळात आम्ही बोलू शकत नाही असे सांगत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएम बाबतच्या सर्व आरोप, तक्रारी या खोट्या असल्याचे सांगितले.
ईव्हीएमशी छेडछाड करण्याच्या चर्चेला काही फायदा नाही. ईव्हीएम हॅक करता येत नाही, हे न्यायालयाने मान्य केले आहे. मात्र ईव्हीएमवर संशय निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. निवडणुकीच्या सात-आठ दिवस आधी ईव्हीएम तयार असतात. एजंटसमोर ईव्हीएम सील केले जाते. मतदानानंतर ईव्हीएम सील केले जातात. ईव्हीएममध्ये अवैध मतांची शक्यता नाही. ईव्हीएमची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आहे असे कुमार म्हणाले. दिल्लीची ही ईव्हीएम निवडणूक असल्याचे सांगण्यात आले. मतदार यादीतून नावे वगळल्याची तक्रार करण्यात आली आहे. मतमोजणी संथगतीने होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रश्नांची उत्तरे देणे ही आपली जबाबदारी आहे. पारदर्शकता ही आमची प्राथमिकता आहे. मतदार यादीत चुकीच्या नोंदी केल्याचे आरोप ऐकून मन दुखावते, असे राजीव कुमार म्हणाले.
मतदान संपण्यापूर्वी मतदान अधिका-यांना अनेक गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे अंतिम मतदानाच्या टक्केवारीशी संध्याकाळी ५ वाजताच्या आकड्यांची तुलना करणे योग्य नाही. मतदान संपल्यानंतर, प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदान प्रतिनिधींना फॉर्म १७ सी दिला जातो. या फॉर्ममध्ये त्या मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाची नोंद असते, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांबद्दल असभ्य भाषा वापरू नका. निवडणूक प्रचारात भाषेची काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी राजकीय पक्षांना, नेत्यांना दिला.