नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषणाने गंभीर स्वरुप धारण केले असून शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० पार पोहोचला आहे. दिल्लीतील १८ प्रदूषण मापन केंद्रांवर हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली आहे. जहांगीरपुरी येथे सर्वाधिक ४५९ एक्यूआयची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे. हवेची गुणवत्ता खालावल्याने दिल्लीकरांचा श्वास कोंडला असून श्वसनाचे अनेक आजार जडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्याआकडेवारीनुसार, जहांगीरपुरी येथे सर्वाधिक ४५९ एक्यूआय नोंदवण्यात आला. त्यापाठोपाठ आयआयटी दिल्ली येथे ४४७, पंजाबी बाग येथे ४४६, अलीपूर येथे ४३७, विवेक विहार येथे ४३४, नौरोजी नगर रिंग रोड येथे ४१६, आर. के. पुरम येथे ४१६, तर एम्स परिसरात ४०२ एक्यूआय नोंदवण्यात आला. इंडिया गेट परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३९९ इतका होता. आनंद विहार येथे २९६ एक्यूआय नोंदवण्यात आला. बुधवारी दिल्लीचा एक्यूआय ३७७ वर पोहोचला होता. २० जानेवारीनंतरची ही सर्वाधिक प्रदूषणाची पातळी होती. जानेवारीमध्ये हा निर्देशांक ३७८ इतका नोंदवण्यात आला होता. बुधवारी राजधानीतील २२ केंद्रांवर हवेची गुणवत्ता गंभीर श्रेणीत पोहोचली होती. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणात आणखी वाढ होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. दिल्लीतील प्रदूषणामागे अनेक घटक कारणीभूत असल्याचे निर्णय सहाय्यक प्रणालीच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
बुधवारी दिल्लीतील प्रदूषणात शेतातील पिकांचे पाचरट जाळण्याचा वाटा २०.२ टक्के, तर वाहनांमधून होणा-या उत्सर्जनाचा वाटा १५.५ टक्के होता. औद्योगिक क्षेत्राचा वाटा २.९ टक्के, निवासी भागांचा ३.८ टक्के, बांधकामांचा २.२१ टक्के, कचरा जाळण्याचा १.३ टक्के आणि रस्त्यांवरील धुळीचा १.१ टक्के होता. दिल्लीला लागून असलेल्या एनसीआरमधील शहरांमधूनही प्रदूषणात भर पडत आहे. गाझियाबादचा वाटा ७ टक्के, रोहतकचा ३.८ टक्के, गुरुग्रामचा २.७ टक्के, सोनीपतचा २.२ टक्के, जिंदचा १.८ टक्के आणि भिवानीचा १.३ टक्के नोंदवण्यात आला आहे. इतर स्रोतांचा वाटा २८.५ टक्के असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
संकट नेमके काय?
– विषारी हवेचा थर
दिल्लीच्या आकाशात धूर आणि धुक्याची जाड चादर पसरली असून दृश्यमानता कमालीची घटली आहे.
– विक्रमी एक्युआय
आनंद विहार, बवाना आणि जहांगीरपुरी यांसारख्या अनेक भागात हवेचा दर्जा निर्देशांक तब्बल ४५० च्या पुढे नोंदवला गेला आहे.
– आरोग्याला गंभीर धोका
ही हवा निरोगी व्यक्तीलाही आजारी पाडणारी असून लहान मुले, वृद्ध आणि दमा असलेल्या रुग्णांसाठी अत्यंत प्राणघातक ठरत आहे.
प्रदुषणाची प्रमुख कारणे
– शेतातील काढ जाळणे
पंजाब आणि हरियाणामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतातील पेंढा(काढ) जाळल्यामुळे निर्माण होणारा विषारी धूर वा-यासोबत दिल्लीत येतो.
– वाहनांचे प्रदूषण
दिल्लीतील वाहनांची अफाट संख्या आणि त्यातून निघणारा कार्बन हवेत मोठ्या प्रमाणात मिसळत आहे.
– हवामानातील बदल
हिवाळ्यात वा-याचा वेग मंदावल्यामुळे आणि थंडीमुळे हवेतील घातक कण जमिनीलगतच साचून राहतात, ते वर जात नाहीत.
– बांधकामांमुळे उडणारी धूळ
मेट्रो आणि विविध मोठ्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे उडणारी सूक्ष्म धूळ हवेत तरंगत राहते.
















