विशाखापट्टनम : अतितटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या आशुतोष शर्माने लखनौच्या तोंडी आलेला विजय खेचून आणल्याने लखनौवर दिल्लीच ‘कॅपिटल’ ठरल्याचे दिसले.
आशुतोष शर्माने गेलेला सामना खेचून आणला आणि दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या सामन्यात विजय मिळवून दिला. १ विकेट राखून हा विजय मिळवला. शेवटच्या षटकात ६ चेंडूत ६ धावांची गरज होती. ऋषभ पंतने शहबाज अहमदच्या हाती चेंडू सोपवला. शेवटची विकेट हाती होती. मोहित शर्मा स्ट्राईकला होता. त्यामुळे धाकधूक वाढली होती. पहिला चेंडू खेळताना फसला, पण ऋषभ पंतने स्टंपिंगची संधी सोडली. त्यानंतर दुस-या चेंडूवर चोरटी धाव घेताना रनआऊटही मिस झाला. अखेर अशुतोष शर्माला स्ट्राईक मिळाली आणि तिस-या चेंडूवर षटकार मारून विजय मिळवून दिला. तो ६६ धावा करून नाबाद परतला.
विशाखापट्टणममध्ये दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लखनौने ८ विकेट्स गमावल्यानंतर २०९ धावा केल्या. मिचेल मार्शने ७२ आणि निकोलस पूरनने ७५ धावा केल्या. उत्तरादाखल खेळताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. संघाने ७ धावांत ३ विकेट गमावल्या होत्या. जॅक फ्रेझर-मॅगार्क १ धावांवर, अभिषेक पोरेल शून्य धावांवर आणि समीर रिझवी ४ धावांवर बाद झाले.
अशा परिस्थितीत, ७ व्या क्रमांकावर आलेल्या आशुतोष शर्माने ३१ चेंडूत नाबाद ६६ धावा करून संघाला विजय मिळवून दिला. त्याने ५ चौकार आणि ५ षटकार मारले. आशुतोषने ट्रिस्टन स्टब्ससोबत ४८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर त्याने विपराज निगमसोबत ५५ धावा जोडल्या. शेवटच्या विकेटसाठी ६ चेंडूत १९ धावांची नाबाद भागीदारी झाली.