दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर परतली आहे. केकेआरने दिल्ली कॅपिट्ल्सवर त्यांच्याच घरच्या मदौनात अर्थात अरुण जेटली स्टेडियममध्ये १४ धावांनी विजय मिळवला आहे.
कोलकाताने दिल्लीला विजयासाठी २०५ धावांचे आव्हान दिले होते. मात्र दिल्लीला २० ओव्हरमध्ये ९ विकेट्स गमावून १९० धावांपर्यंतच पोहचता आलं. केकेआरने अशाप्रकारे आयपीएल २०२५ मधील एकूण चौथा विजय मिळवला. केकेआरसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अटीतटीचा होता. केकेआरने विजयी होत आपले आव्हान कायम ठेवले आहे. तर दुस-या बाजूला दिल्लीचा हा या मोसमातील एकूण चौथा तर सलग दुसरा पराभव ठरला.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी रहमानउल्लाह गुरबाज आणि सुनील नारायण यांच्या जोडीने पुन्हा एकदा तोडफोड सुरुवात करून दिली. यावेळी दोघांनीही स्फोटक फलंदाजी केली आणि फक्त ३ षटकांत ४८ धावा केल्या. ही भागीदारी मिचेल स्टार्कने मोडली आणि त्याने गुरबाजला (१२ चेंडू २६ धावा) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. सुनीलने १६ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २७ धावा केल्या.
कर्णधार अजिंक्य रहाणेने सलामीवीरांनी दिलेल्या जलद सुरुवातीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण तो मोठी खेळी खेळू शकला नाही. रहाणेने १४ चेंडूत २६ धावा केल्या. वेंकटेश अय्यर फक्त ७ धावा करून बाद झाला. अंगकृष रघुवंशी हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता आणि त्याने ३२ चेंडूत ४४ धावांचे योगदान दिले. रिंकू सिंगनेही काही चांगले फटके खेळले पण नंतर तोही २५ चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा करून तंबुत परतला.