नागपूर : शेती प्रश्नाच्या मुद्द्यावर शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे शुक्रवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार होते. मात्र, ही भेट रद्द झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आजच्याऐवजी सोमवार किंवा मंगळवारची वेळ अमित शाह यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांसह आम्ही सोमवारी भेटीची वेळ मागितली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिल्लीत राज्य सरकारचे महत्व कमी झाले असल्याचे म्हटले आहे. कांदा निर्यातबंदी, इथेनॉल आणि इतर प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री दिल्ली अमित शहा यांना भेटणार होते. परंतु, तेही यांना वेळ देत नाहीत. त्यामुळे दिल्लीदरबारी यांचे महत्त्व किती आहे, हे कळते; अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. कांदा निर्यातबंदी आणि इथेनॉलमुळे उस उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यावर आधारित कारखानीदारीदेखील अडचणीत आहे. आठ दिवसांपासून यावर तोडगा निघालेला नाही, हे दुर्दैव आहे, असे दानवे म्हणाले.