पंढरपूर/प्रतिनिधी
कार्तिकी यात्रेसाठी पंढरीत भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले असून, त्यांनी विठुरायाच्या दर्शनरांगेत मोठी गर्दी केली आहे. हजारो भाविक रांगेत उभे आहेत. ही दर्शनरांग गोपाळपूरपर्यंत करण्यात आली आहे. यंदा रांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी दर ५० मीटर अंतरावर पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. त्यामुळे दर्शन रांग जलद व द्रुतगतीने चालू असून, भाविकांचे जलद व सुलभ दर्शन होत आहे. सध्या दैनंदिन सुमारे ३० हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन घडत आहे. दर्शनाला सुमारे १२ ते १४ तास लागत आहेत.
दर्शनरांगेत भाविकांची गर्दी वाढत असून, दर्शन रांगेवर ऊन, वारा, पावसापासून संरक्षणासाठी आच्छादन, पिण्यास मिनरल वॉटर-चहा, स्पिकरवर अभंग आणि भक्तीगीते, दर्शन रांगेतून स्वच्छतागृहात जाणा-यांना पास, सतर्क सुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन व्यवस्थापन, पायाला खडे टोचू नये, म्हणून मॅटिंग, कुलर-फॅन, विश्रांती कक्ष, हिरकणी कक्ष, लाईव्ह दर्शन, सूचना फलक, सॅनिटरी नॅपकिन, आपत्कालिन मदत कक्ष व आरोग्य सुविधा उपलब्ध असून पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल.. या जयघोषांनी दर्शनरांग दणाणून गेली आहे. दर्शन रांगेतील कोणताही भाविक उपाशीपोटी जाऊ नये, यासाठी मंदिर समितीमार्फत पत्राशेड येथे दि. २१ ते २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
या मोफत अन्नछत्राचा शुभारंभ मंगळवार दि.२१ नोव्हेंबर २०२३ रोजी कुमार आशीर्वाद, जिल्हाधिकारी सोलापूर तसेच सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या उपस्थितीत पार पडला. या अन्नछत्राची जबाबदारी विभाग प्रमुख बलभीम पावले व सहायक विभाग प्रमुख दत्तात्रेय इंगळे यांना देण्यात आली असून, प्रसाद वाटपासाठी संत मिराजी महाराज पुरूष व महिला सेवेधारी मंडळ, अकोला या स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात येत आहे.
उपासपोटी राहू नये म्हणून सोय
आषाढी यात्रेत बागलकोट जिल्ह्यातील बंडीगणीमठ येथील चक्रवर्ती दानेश्वर महाराज या विठ्ठल भक्ताने अन्नदान केले होते. त्याच धर्तीवर कार्तिकी यात्रेत दर्शन रांगेत असलेल्या प्रत्येक भाविकाला पोटभर खाऊ घालून दर्शनासाठी पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दर्शन रांगेतील भाविकांना पुरेशा प्रमाणात अत्याधुनिक सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील.
सहअध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर