सोलापूर : विधानसभा उमेदवारांचे अर्ज दाखल करणे, दिवाळी, पाठोपाठ उमेदवारांच्या प्रचारफे-या व नेत्यांच्या सभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक निकालाचा जल्लोष यामुळे यंदा फटाके विक्रेत्यांची ख-याखु-या अर्थाने दिवाळी साजरी होणार आहे. यामुळे सोलापूर जिल्ह्यासह शहरांतील फटाक्यांच्या स्टॉलची संख्या वाढली असून फटाके विक्रेते श्रीकांत हेळवे यांनी मोठ्या उलाढालीची अपेक्षा व्यक्त केली.
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरांत मधला मारुती, चार पुतळ्याच्या पाठीमागे, अशोक चौक, कर्णिक नगर, आसरा, सैफुल अशा विविध ठिकाणी फटाक्यांचे स्टॉल्स लागले आहेत. लहान मुले, तरुण-तरुणी यांच्यात दिवाळीनिमित्त फटाके उडवण्याचा अधिक उत्साह व आकर्षण असते. विविध प्रकारांचे आकर्षक व आवाजाचे लक्ष्यवेधी फटाके बाजारात आले असून लक्ष््मी बॉम्ब, १२० शॉट, भुईचक्र, अनार (झाड), बटरस्कॉच, पिकॉक, कलर कोटी, लोखंडी पाईपातले तारामंडल, दिवाळी फ्लॉवर, व्हिजलिंग शॉट, १२० डेसिबलच्या मयदित असलेले सुतळी बॉम्ब बाजारात विक्रीला आले असल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
यंदा फटाक्यांच्या केमिकलवर जीएसटी लागल्यामुळे ग्राहकांना महागाईची झळ बसणार आहे. फटाक्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणा-या तामिळनाडूतील शिवकाशी येथील सर्वाधिक फटाके महाराष्ट्रात दाखल होतात. शिवाय नांदेड, जळगाव, तेरखेडा व मंगळवेढा येथून फटाके विक्रीसाठी बाजारात दाखल होत आहेत. गेल्या काही वर्षांत विशेष करून कोरोनानंतर महागाईमुळे फटाके उडवण्याकडील लोकांचा कल बराच कमी झाला आहे. परंतु दिवाळीच्या चार-पाच दिवसांत मुख्यत्वे लक्ष्मीपूजन, पाडवा या दिवशी फटाक्यांची आतषबाजी केली जाते. यंदा दिवाळीपूर्वी विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.
उमेदवार अर्ज दाखल करणार असून त्यावेळी शक्तिप्रदर्शन करताना फटाके फोडले जाणार आहेत. तसेच दिवाळी सुरू होत असल्याने सर्वसामान्य फटाके फोडून दिवाळी साजरी करणार आहेत. दिवाळी संपताच प्रचाराला गती प्राप्त होईल. उमेदवारांच्या प्रचारफे-या, नेत्यांच्या सभांवेळी फटाके फोडले जातात. त्यामुळे फटाक्यांना विशेष मागणी दिसून येत आहे. नोव्हेंबरच्या २३ तारखेला निकाल लागल्यावर विजयी उमेदवारांच्या मिरवणुकांच्या वेळी फटाक्यांची आतषबाजी होईल. त्यामुळे पुढील महिनाभर जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत फटाक्यांची मागणी असून दिवाळीपेक्षा निवडणुकीत यंदा जास्त फटाके फुटणार आहेत.
यंदा दिवाळीसोबत निवडणुका पार पडणार आहेत. राजकीय नेत्यांच्या होणा-या प्रचारसभांवेळी फटाक्यांची आतषबाजी हमखास केली जाते. परंतु, आचारसंहिता व खर्चाच्या मर्यादेमुळे फटाक्यांना कितपत मागणी होईल हे पाहावे लागणार आहे. यंदा फटाक्यांच्या केमिकलवर १८ टक्के जीएसटी लागल्यामुळे किमतीत वाढ झाली आहे. दिवाळीनंतर निवडणुका असल्याने या काळात फटाक्यांची आवक कमी झाल्यास राजकीय नेत्यांना दरवाढीची झळ बसण्याची शक्यता आहे असे सिध्देश्वर फायर वर्क्सचे एम. ए. पटेल यांनी सांगीतले.