23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeपरभणीपरभणी मनपा आयुक्त तृप्ती सांडभारे यांच्या हकालपट्टीची मागणी

परभणी मनपा आयुक्त तृप्ती सांडभारे यांच्या हकालपट्टीची मागणी

परभणी : एकीकडे शासन स्वच्छ भारतच्या नावाखाली परभणी जिल्ह्याला लाखो करोडोंचा निधी देत असून दुसरीकडे मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर या मनमानी कारभार करत आहेत. त्यांच्या आडमुठेपणामुळे घंटा गाड्या बंद असल्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी कच-याचे ढिग साचले आहेत. तसेच वस्त्या वस्त्यांमधील नाल्यांचे घाण पाणी हे रस्त्यावर येत आहे. त्यामुळे घाणीचे साम्राज्य वाढत चालले असून परभणी शहरात डेंगू नावाचा संसर्गजन्य रोग झपाट्याने वाढत आहे. अशा प्रकारे कर्तव्यभ्रष्ट मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी दि. २२ रोजी भीमशक्ती जिल्हा संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनास देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून मनपा आयुक्त यांनी मनमानी करून नवीन घरपट्टी देणे बंद केले आहे. त्यामुळे स्लम वस्तीतील नागरिकांना घरकुल घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. परभणी शहरामध्ये एकीकडे अनधिकृत बांधकामाचा ऊत आला आहे. दुसरीकडे गोरगरीब जनता शासनाच्या योजनेच्या लाभापासून वंचित रहावी यासाठी जाणूनबुजून घरपट्टी बंदचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून बंद केलेल्या नवीन घरपट्टया चालू कराव्यात. जेणे करून गरीबांना घरकुलाचा लाभ घेता येईल.

तसेच परभणीची बकाल व भकास अवस्था करणा-या मनपा आयुक्त सांडभोर यांची तात्काळ हकालपट्टी करावी अन्यथा भीमशक्ती संघटनेच्या वतीने जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. याप्रसंगी भीमशक्तीचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार सुखदेव, राज्य सरचिटणीस रवी सोनकांबळे, म. महासचिव प्रवीण कणकुटे, म. उपाध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे, जिल्हाध्यक्ष सतीश भिसे, जिल्हा प्रवक्ते सुहास पंडित, तातेराव वाकळे, शहराध्यक्ष विक्रम काळे, ता.अध्यक्ष राहुल कणकुटे, संजय वाव्हळे, दीपक कणकुटे, बबन वाव्हळे, अनिल सूर्यवंशी, सुरेश यादव आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR