चंद्रपूर : महाराष्ट्रात पाहायला गेलं, तर कोल्हापूरची लाल मिरची प्रसिद्ध आहे. पण आता मात्र कोल्हापूरच्या मिरचीला चंद्रपूरची मिरची चांगलीच टक्कर देत आहे. चंद्रपूरच्या या मिरचीने थेट युरोपियनांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. या मिरचीला युरोपातून मागणी वाढल्याने चंद्रपूरची मिरची मोठ्या प्रमाणात युरोपात निर्यात करण्यात येणार आहे. यामुळे शेतक-यांनाही चांगला फायदा होणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जात आहे. वेगवेगळ्या जातीच्या मिरचीची लागवड चंद्रपुरात केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना, राजुरा तालुक्यात कापूस, सोयाबीनचे पीक घेतले जात होते, प्रमुख पिकात कापूस, सोयाबीनचा समावेश आहे. आता मात्र मिरची पिकाकडेही शेतकरी वळले आहेत.
चंद्रपुरात पारंपरिक पद्धतीने मिरचीचे पीक घेतले जात होते. पण त्याला मागणी नव्हती. त्यात या मिरचीला भावही मिळेना अशी स्थिती होती. अशात कृषक स्वराज शेतकरी उत्पादक कंपनीने राजुरा आणि कोरपना तालुक्यातील मिरची उत्पादकांना आधुनिक पद्धतीने मिरची पिकाची लागवड करण्यासाठी प्रोत्साहित केले. महत्त्वाचे म्हणजे युरोपियन मानकांनुसार मिरची पिकाचे उत्पादन घेण्याबाबत कृषीतज्ज्ञांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे पहिल्यांदाच कोरपना तालुक्यात ८५० हेक्टर आणि राजुरा तालुक्यात ३०० एकरमध्ये मिरचीची लागवड करण्यात आली. लागवड करण्यात आलेल्या मिरची पिकाचे युरोपियन मानकांनुसार संवर्धन करण्यात आले आहे.