कौसडी : कौसडी येथे गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना मंजूर असून जीवन प्रधिकरणच्या वतीने गेल्या दोन महिन्यापासून काम सुरू आहे. हे काम करीत असताना गावातील सिमेंटचे रस्ते फोडून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या जलवाहिनीमुळे गावातील रस्त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे काम करीत असताना काही ठिकाणी खोली खूप कमी घेतली जात आहे. खोदकाम करून दोन, चार दिवस तसेच ठेवल्यामुळे या ठिकाणी रहदरीला अडथळा निर्माण होत आहे. हे रस्ते सिमेंट काँक्रीटने भरून तात्काळ दुरुस्ती करावी अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
या ठिकाणी जलवाहिनीच्या कामासाठी लागणारे साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून याबाबत संबंधित विभागाचे अधिका-यांनी या ठिकाणी पाहाणी करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या बाबत ग्रामस्थांनी १४ डिसेंबर रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या कार्यकारी अभियंता भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनावर शेख बिलालोद्दीन, समीर खान पठाण, अन्वर शेख हमीद हरिभाऊ खैरे, यशवंतराव देशमुख, तजमुल शेख सलीम यांचे स्वाक्षरी आहेत.
ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
जीवन प्रधिकरण विभागामार्फत सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून याबाबत कार्यकारी अभियंत्याची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. पण अद्यापही कामावर अधिकारी मात्र आले नाहीत. त्यांनी संबंधित ठेकेदाराला कोणत्याही सूचना न दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबाबत सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे