परभणी : जिल्ह्यात मदर डेरी दुध संकलन केंद्र मंजूर करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करण्यात आली आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजा भाऊ लोडे, एकनाथराव भालेराव, निलेश साबळे आदींनी रविवार, दि.१० नागपूर येथे मंत्री गडकरी यांची भेट घेवून त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. या निवेदनात परभणी जिल्ह्यात शासकीय दूध योजना बंद झाल्यामुळे जिल्ह्यात एक-दोन खाजगी दूध डेअरी आहेत. पण त्यांच्या दूध संकलनात वाढ झाल्यानंतर ते कमी दराने दूध खरेदी करतात व जिल्ह्याच्या ठिकाणी एकही शीतकरण केंद्र उपलब्ध नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतक-यांची खूप फसगत होत आहे.
मदर डेरीच्या दूध संकलनासाठी शासकीय दूध योजनेची जागा व प्लॉट उपलब्ध आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्याचा समावेश मदर डेरीमध्ये केल्यास नक्कीच जिल्ह्यातील शेतक-यांना व शेतमजुरांना याचा फायदा होईल व आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविण्याची संधी उपलब्ध होईल तसेच १०० टक्के हमीभाव व एक चांगली केंद्र सरकारची डेअरी परभणी जिल्ह्यासाठी उपलब्ध होण्यास मदत होईल, असे या निवेदनात नमूद केले आहे.