मानवत : शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये असलेल्या सिंधखाना व कु-हाडे गल्ली या दोन भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरी समस्या भेडसावत आहेत. त्या नागरी समस्या सोडवण्यात याव्यात अशी मागणी भाजपाच्या पदाधिका-यांनी मुख्याधिकारी कोमल सावरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मानवत शहराचा प्रभाग क्रमांक २ हा सर्वात मोठा असलेला प्रभाग आहे. या प्रभागात आंबेगाव नाका सिंदखाना परिसर कु-हाडे गल्ली यासह बौद्ध नगर व मोंढयातील काही भाग आहे. या प्रभागातील समस्यांची दखल घेऊन भाजपचे तालुका उपाध्यक्ष अमोल कु-हाडे व शहराध्यक्ष नागनाथ कु-हाडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मुख्याधिकारी कोमल सावरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी या समस्या बाबत निवेदन दिले. या निवेदनात सिंदखाना परिसरात गेल्या ब-याच दिवसापासून पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागत आहे.
तर कु-हाडे गल्ली या भागात नगरपालिकेकडून जी नाली बनवण्यात आली आहे त्या नालीचा उतार सुरळीत न काढल्याने ही नाली जागच्या जागीच तुंबली आहे. नाली तुंबल्याने नालीचे पाणी नागरिकांच्या घरात जात आहे. या तुंबलेल्या नालीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या डासाच्या प्रार्दुभावाने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नालीचा उतार काढून देण्यासह पाणी समस्या सोडवण्याची मागणी या निवेदनात केली आहे.
या निवेदनावर भाजप तालुका उपाध्यक्ष अमोल कु-हाडे, शहराध्यक्ष नागनाथ कु-हाडे, रवी मल्लिकार्जुन वाघमारे उपशहर प्रमुख उमेश घाडगे मानवत तालुकाउपअध्यक्ष, प्रविण मगर भाजपा युवक शहर अध्यक्ष, विकास देशमाने, वामन चव्हाण, सोपान शिसोदे, सोपान कच्छवे, अनिल घाटूळ यांच्यासह नागरीकांच्या स्वाक्ष-या आहेत. दरम्यान पाणीपुरवठा विभाग व स्वच्छता विभागांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी कोमल सावरे यांनी दिली आहे.