मानवत : मानवतरोड रेल्वे स्टेशन येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासह एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी मानवतरोड भाजपा प्रकोष्ट प्रमुख डॉ.विजयकुमार तोष्णीवाल यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी मानवतरोड रेल्वे स्टेशन येथे पुणे- नांदेड एक्सप्रेस, पुणे_- निजामाबाद, मुंबई- नागपूर (नंदिग्राम एक्सप्रेस), अजिंठा एक्सप्रेस यांना थांबा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तसेच मानवतरोड रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मवर कोच इंडिकेटर, एचडी डिस्प्ले बोर्ड बसविणे, रेल्वे स्टेशनवर महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वच्छतागृह, प्रवाशांसाठी वेटिंग रूम आदी सर्व सुविधा देण्यात याव्यात. अमृत काल योजनेअंतर्गत मानवतरोड रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण करून रेल्वे स्टेशनवर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी सर्व शिष्टमंडळा सोबत सकारात्मक चर्चा करून सर्व मागण्याला सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी मानवतरोड स्टेशन भाजपा प्रकोष्ट प्रमुख डॉ. विजयकुमार तोष्णीवाल, परभणी जिल्हा रेल्वे प्रवासी प्रकोष्ट सहसंयोजक के. डी. वर्मा, उपप्रमुख प्रकाश करपे, सचिव श्याम झाडगावकर, सहसचिव प्रा. अशोक खोडवे (सोनपेठ), सहकोषाध्यक्ष कृष्णा बाकळे, सदस्य विवेक पोकळे, वैभव दगडू यांची उपस्थिती होती.