नागपूर : काँग्रेसचा १३८ वा स्थापना दिवस गुरुवारी नागपूर येथे साजरा करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात काँग्रेसने नागपुरात मोठ्या रॅलीने केली आहे. दीक्षा भूमी येथे आयोजित कार्यक्रमातून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अनेक मुद्द्यांवरून चक्क मराठीतून निशाणा साधला. ते म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकार आणि आरएसएसमुळे लोकशाही संकटात आहे. सगळ्याच गोष्टींचे दर वाढले आहेत, आवश्यक वस्तूंचे दर आकाशाला भिडले आहेत, परंतु त्याच्याबद्दल मोदी काही बोलत नाहीत.
ते म्हणाले की, काँग्रेसने नेहमीच संसदीय लोकशाही आणि समानतेवर आधारित भारत निर्माण करण्यासाठी काम केले आहे. हाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उद्देश आहे. काँग्रेसला लोकांचे सार्वजनिक कल्याण आणि प्रगती करायची आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, सुशिक्षित संघटित आणि शिक्षित म्हणजेच संघर्ष करा एक व्हा, ही त्यांची वाणी आहे जी आज आपण पुढे घेऊन गेलो पाहिजे. ही वाणी सोबत नाही घेतली तर आपण या जगात राहू शकणार नाही. कारण जे काही मिळाले आहे ते जाणार आहे.
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, आम्ही जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या विचारधारेवर चालतो, पण मोदी कुणाच्या विचारधारेवर चालतात? असा सवाल करत ते आरएसएसची विचारधारा समानतेच्या विरुद्ध आहे आणि ते आज ना उद्या पुन्हा दलितांना खाली दाबतील, असा आरोप केला.
काँग्रेसच देशाला एकसंध ठेवू शकतो
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी मेळाव्यात सांगितले की, फक्त काँग्रेस पक्षच देशाला एकसंध ठेवू शकतो आणि गांधी घराण्याने काँग्रेसला नेहमीच एकसंध ठेवले आहे. काँग्रेस पक्षाचा कोणताही कार्यकर्ता कोणत्याही स्तरावर पोहोचू शकतो. हीच पक्षाची सर्वसमावेशकता आहे.