24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयदेशातील लोकशाही धोक्यात, संविधान बदलण्याचे प्रयत्न

देशातील लोकशाही धोक्यात, संविधान बदलण्याचे प्रयत्न

जयपूर : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सर्वच पक्ष आपला जोरदार प्रचार करत आहेत. अशातच, काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवार दि. ६ एप्रिल रोजी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राजस्थानच्या जयपूरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना त्या म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांपासून आपला देश अशा सरकारच्या ताब्यात आहे, ज्याने महागाई आणि बेरोजगारीशिवाय काहीही दिले नाही. सरकारने सर्वसामान्य जनतेचा छळ केला, अशी टीका त्यांनी केली.

सोनिया गांधी पुढे म्हणतात, आपल्या महान पूर्वजांनी कठोर संघर्षाच्या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इतक्या वर्षांनंतर आता सर्वत्र अन्यायाचा अंधार पसरला आहे. याविरुद्ध लढून न्यायाचा दिवा पेटवण्याचा संकल्प आपण सर्वांनी केला पाहिजे. देशापेक्षा कोणी मोठा असू शकतो का? जो असा विचार करेल, त्याला देशातील जनता धडा शिकवतील. दुर्दैवाने आज असे नेते आपल्या देशात सत्तेवर आहेत, जे स्वत:ला महान समजतात आणि लोकशाहीचे वस्त्रहरण करतात. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावून भाजपमध्ये घेतले जाते. आज आपल्या देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. कष्टाने उभारलेल्या लोकशाही संस्था राजकीय हस्तक्षेपामुळे उद्ध्वस्त होत आहेत. आपली राज्यघटना बदलण्याचे षडयंत्र रचले जात आहे. या हुकूमशाहीला आपण आपण उत्तर देऊ.

शेतक-यांची मुले बेरोजगार
आज रोजच्या कमाईतून अन्न मिळवणेही कठीण झाले आहे. कष्टकरी कामगारांच्या कष्टाचे मोल कमी होत आहे. स्वयंपाकघराचा खर्च देशातील महिलांची रोजचे परीक्षा घेतो. शेतकरी आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले बेरोजगार आहेत. गरीब माणसाने कितीही प्रयत्न केले तरी, वर येऊ शकत नाहीत. मित्रांनो, आज देश तुमची वाट पाहत आहे. त्यामुळेच काँग्रेसने आपला जाहीरनामा पाच भागात विभागला आहे. मला विश्वास आहे की, काँग्रेसचे सहकारी कठोर परिश्रम करेल आणि प्रत्येक संकल्प आणि हमी देशाच्या कानाकोप-यात नेण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR