नवी दिल्ली : भारतात डेंग्यूमुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. मादी एडिस डासामुळे पसरणा-या डेंग्यूवर आतापर्यंत कोणतेही प्रभावी उपचार किंवा लस उपलब्ध नाही. मात्र, आता लवकरच भारताला डेंग्यूची लस मिळणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने ही याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
भारतात आतापर्यंत कोरोनापासून ते सर्व्हाइकल कँसरसारख्या आजारांची लस बनविण्यात आली आहे, पण डेंग्यूची लस तयार करण्यात शास्त्रज्ञांना अपयश आले होते. पण, आता एक चांगली बातमी समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार, भारताला लवकरच स्वदेशी बनावटीची डेंग्यूची लस मिळणार आहे.
डेंग्यूची लस भारतात तयार झाली असून दोन टप्प्यांच्या चाचण्याही झाल्या आहेत. या दोन्हीच्या यशानंतर या लसीच्या तिस-या टप्प्यातील चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी केवळ आयसीएमआरद्वारेच घेतली जाते. पहिल्या चाचणीत लसीच्या सुरक्षिततेची तपासणी करण्यात आली होती. तर, दुस-या चाचणीत अँटीबॉडीज तयार करते की नाही, हे पाहिले गेले. आता तिस-या चाचणीत हीडेंग्यूवर परिणामकारक आहे की नाही, याची चाचपणी केली जाईल.
कधी मिळणार?
डेंग्यू लसीची फेज ३ चाचणी कधी पूर्ण होईल आणि डेंग्यू रोखण्यासाठी ही लस भारतातील लोकांना कधी उपलब्ध होईल, याची माहिती कउटफ शास्त्रज्ञ डॉ. सरिता नायर यांनी दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, डेंग्यू लसीची फेज-३ चाचणी या वर्षाच्या तिस-या तिमाहीत सुरू होणार आहे. म्हणजेच २०२४ च्या जुलै-ऑगस्टपासून ही चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. ही चाचणी देशभरातील १९ ठिकाणांवर केली जाईल. ही चाचणी पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन वर्षे लागू शकतात.