शेगाव : प्रतिनिधी
१३ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथून श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने मंदिरामधून ७०० वारक-यांसह हजारो भाविक भक्तांच्या सहभागाने आषाढी एकादशी महोत्सवात सहभागी होण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान केले. संतनगरीत श्रींच्या पालखीच्या निमित्ताने टाळ मृदंगासह हरिनामाच्या नामघोषात संत नगरी दुमदुमली.
श्रींची पालखी अकोला, रिसोड, परमणी, परळी वैजनाथ, उस्मानाबाद, तूळजापूर, सोलापूर या मार्गाने ३३ दिवस पायीवारी आणि एकूण ७५० किलोमिटर प्रवास करीत १५ जुलै रोजी श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्रींची पालखी मुक्कामास पोहोचणार आहे.
५ दिवसापर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथे पालखी मुक्कामास राहील. आषाढी एकादशी सोहळा व काला आटोपल्यावर २१ जुलै रोजी सकाळी श्रींची पालखी शेगांवकडे परतीच्या मार्गाने प्रस्थान करेल. ११ ऑगस्ट रोजी पालखी खामगाव मार्गे संतनगरी शेगावला परत येईल. गुरुवारी वारीला येणारे भाविक तसेच विदर्भ, खान्देशातील, मराठवाडा, मुंबई, पुणे, नागपूर येथील श्रींच्या भाविकांनी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीच्या वारीला माऊली जात असल्याने दर्शन घेतले.