मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्रातील व्यवस्थापन समितीचे प्रमुख झाले आहेत. या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील स्थान देण्यात आले आहे. मात्र, या सर्वांत नगर विकास मंत्री असून देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फूटल्याचे पाहावयास मिळत आहे.
मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी काही योजना घोषित केल्या होत्या. या योजना देखील आता लवकरच बंद होणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आणि शिवभोजन थाळी यांचा समावेश आहे. आनंदाचा शिधा ही योजना देखील थांबवण्याचा देवेंद्र फडणवीस सरकार विचार करत आहे. राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण वाढत असल्याने अशा योजना थांबवण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
महायुतीमध्ये नेमके काय सुरू आहे?
मुंबईमध्ये २००५ मध्ये महापूर आला होता. या महापुरानंतर आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली होती. राज्यातील आपत्तीच्या काळात ही समिती अत्यंत महत्त्वाची मानले जाते. मात्र, आता त्यातूनच एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आल्यामुळे महायुतीमध्ये नेमके काय सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मंत्री उदय सामंत नाराज
एकीकडे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे स्वत:च्याच खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओ यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे त्यांनी या संदर्भात आपल्या नाराजीचे पत्र देखील उद्योग सचिवांना दिले आहे. धोरणात्मक निर्णय आणि महत्त्वाच्या कामकाजाबाबत त्यांनी दक्षता घ्यावी, असाच सज्जड दम या पत्राच्या माध्यमातून उदय सामंत यांनी दिला आहे. त्यामुळे आता महायुतीमधील शिवसेनेचे सर्वच मंत्री हे आनंदी नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शरद पवारांचे गुण अजित पवारांमध्ये
या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील टीका केली आहे. या समितीवर अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार यांना शरद पवार यांचा वारसा लाभला आहे. पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी गुजरातच्या भूकंपानंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनचा कारभार शरद पवार यांच्या हातात दिला होता. त्यांना याचा चांगला अनुभव आहे. तेच गुण अजित पवार यांच्यामध्ये उतरले असतील, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.