32.7 C
Latur
Thursday, February 20, 2025
Homeमहाराष्ट्रउपमुख्यमंत्री शिंदे १९ फेब्रुवारी रोजी सर्व आमदार-खासदारांसह कुंभमेळयाला जाणार

उपमुख्यमंत्री शिंदे १९ फेब्रुवारी रोजी सर्व आमदार-खासदारांसह कुंभमेळयाला जाणार

मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सर्व आमदार-खासदारांना घेऊन येत्या १९ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे महाकुंभाला जाणार आहेत. कुंभस्रानाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांना एक प्रकारे शह देणार आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या काही आमदारांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याने हे आमदार नाराज असल्याचे समजते. या आमदारांची नाराजी देखील आता उपमुख्यमंत्री शिंदे यांना दूर करावी लागणार आहे.

महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू असतात. महत्वाच्या बैठकांना त्यांची अनुपस्थिती असली की या चर्चांना वेग येतो. दुुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सातत्याने राजकीय धक्के देण्याचे काम सुरूच ठेवले आहे. नुकतेच माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. आता शिवसेना ठाकरे गटाचे जितेंद्र जनावळे यांनी देखील राजीनामा दिला आहे. ते विलेपार्ले येथील उपविभागप्रमुख होते.

उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे राजकीय विरोधक हिंदुत्व सोडल्याची टीका सातत्याने करत असतात. आता हिंदुंचा सर्वात प्रमुख असा कुंभमेळा प्रयागराज येथे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच प्रमुख नेत्यांनी या कुंभमेळयात जाउन कुंभस्रान केले आहे. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कुंभस्रानासाठी जाणार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि मंत्री देखील उपस्थित असणार आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे हे या निमित्ताने शक्तीप्रदर्शनही करतील. सोबतच उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्यावरून हा एक प्रकारे शह देण्याचा प्रयत्न असणार आहे.

आमदारांच्या सुरक्षेत कपात
शिवसेना शिंदेगटाच्या काही आमदारांच्या सुरक्षेत वाय प्लस वरून वाय अशी कपात करण्यात आल्याने आमदारांमध्ये नाराजी असल्याचे समजते. महायुतीचे सरकार आल्यानंतर शिंदेसेनेच्या आमदारांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती. याबाबत आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ­ शिंदे यांच्याकडे आपले म्हणणे मांडल्याचे समजते. या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR