चेन्नई : तामिळनाडूच्या पद्मराजन यांनी तब्बल २३८ वेळा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही पुन्हा एकदा आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. ६५ वर्षीय पद्मराजन हे एका टायर रिपेअर शॉपचे मालक आहेत. त्यांनी १९८८ मध्ये तामिळनाडूमधील मेत्तूर येथून निवडणूक लढवण्यास सुरुवात केली.
जेव्हा त्यांनी निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले तेव्हा लोक त्यांची खिल्ली उडवायचे पण एक सामान्य माणूसही निवडणुकीत भाग घेऊ शकतो हे त्यांना सर्वांना दाखवून द्यायचे होते.
पद्मराजन म्हणाले की, सर्व उमेदवारांना फक्त निवडणुकीत ज्ािंकायचे असते पण माझ्याबाबतीत तसे नाही. केवळ निवडणुकीत भाग घेतल्याने मला आनंद होतो आणि आपण जिंकलो किंवा हरलो याने काही फरक पडत नाही. पराभूत होऊनही आनंदी आहे. ते आताही तामिळनाडूच्या धर्मपुरी जिल्ह्यातून निवडणूक लढवत आहेत. इलेक्शन किंग म्हणून प्रसिद्ध असलेले पद्मराजन यांनी देशभरात झालेल्या राष्ट्रपतीपदापासून ते स्थानिक निवडणुकांमध्ये भाग घेतला आहे.
मी निवडणुकीत कोणाच्या विरोधात उभा आहे, यानेही मला काही फरक पडत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, निवडणूक लढवणे त्यांच्यासाठी अजिबात सोपे राहिलेले नाही. गेल्या अनेक वर्षांत निवडणुकांवर लाखो रुपये खर्च केले आहेत. भारतातील सर्वात अयशस्वी उमेदवार म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळवले आहे.
लोकं आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना संकोच करतात, म्हणूनच मला त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी एक रोल मॉडल बनायचे आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत निवडणूक लढवत राहीन पण कोणतीही निवडणूक जिंकलो तर मलाच आश्चर्य वाटेल असे पद्मराजन यांनी म्हटले आहे.