30.3 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसंधी असतानाही सुप्रिया सुळेंना मंत्री केले नाही

संधी असतानाही सुप्रिया सुळेंना मंत्री केले नाही

पुणे – लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांमध्ये सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट बारामतीमध्ये आमने-सामने येण्याची शक्यता आहे. बारामतीमधील लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रथमच सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाबद्दल वक्तव्य केले आहे. सुप्रियाला मंत्री करण्याची संधी असतानाही मी कधीही तसा विचार केला नाही, असे शरद पवार म्हणाले. बारामती येथे जनतेसोबतच्या संवादात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट यांचे दोन स्वतंत्र उमेदवार असणार आहेत. दोन्ही गटांकडून कॉर्नर बैठकांपासून जाहीर कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. शरद पवार गटातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे याच उमेदवार असणार आहेत. तर अजित पवार गटाकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा झाली नसली तरी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांचे बॅनर आणि पत्रक हे मतदारसंघात लागले आहेत. प्रचाराचा रथही फिरत आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय अशी लढत रंगणार आहे.

बारामतीमध्ये शरद पवार म्हणाले, इंदिरा गांधी यांनी देशाला मान-सन्मान मिळवून दिला. महत्त्वाचे अधिकार असलेल्या व्यक्ती मी पाहिल्या आहेत. राजकारणात मी माझ्या अधिकारांचा वापर किंवा उपयोग मुलीसाठी कधी केला नाही. सुप्रियाला मंत्री करण्याचा अधिकार माझ्याकडे असताना तसा विचारही कधी केला नाही. इतरांचाच विचार केला, असे सांगून सुप्रिया सुळे या मंत्री का झाल्या नाहीत याचे उत्तरच पवारांनी दिले.

मुलींना संधी मिळाली तर कर्तृत्व सिद्ध करतील
उमेदवाराचा विचार करताना क्वालिटीचा विचार मतदारांनी केला पाहिजे, असे सांगताना शरद पवार म्हणाले, लोकांच्या आयुष्यात बदल करू शकलो तर, आपल्या पदाचा उपयोग होतो. आधी शिक्षण म्हटलं की, मुंबई किंवा पुणे याशिवाय पर्याय नव्हता, आता शैक्षणिक हब म्हणून बारामतीकडे बघितले जात आहे. कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या प्रतिष्ठान या संस्था काढल्या. कृषी विकास प्रतिष्ठान संस्थेचा उल्लेख देशातील पहिल्या तीनमध्ये होतो.

डोनेशन नावाचा प्रकार इथे नाही, इथे ही संस्कृती नाही. कर्तृत्ववान फक्त मुले असतात, हे डोक्यातून काढा. मुलींना संधी मिळाली तर, त्या कर्तृत्व सिद्ध करतील, असेही शरद पवार म्हणाले.

त्यांना विधिमंडळात मी आणलं
नरेंद्र मोदींवर टीका करताना शरद पवार म्हणाले, मर्यादा आणण्यासाठी अनेक प्रकारची कामे केली जात आहेत. आम्ही सांगेल तशी व्यक्ती नेमली तर हवा तसा निकाल येईल म्हणून निवडणूक आयुक्त नेमण्याच्या पद्धतीत मोदींनी बदल केला. राष्ट्रवादीची स्थापना मी केली. निवडणूक आयोगाने निकाल दिला की खरी राष्ट्रवादी शरद पवारांची नाही.
अजित पवारांचा नामोल्लेख टाळून शरद पवार म्हणाले, ज्यांच्या हातात पक्ष दिला त्यांना विधिमंडळात मी आणलं होतं.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR