35.9 C
Latur
Saturday, May 10, 2025
Homeराष्ट्रीयपाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा निर्धार?

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याचा निर्धार?

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शहांचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये, पत्रकाराने त्यांना पाकव्याप्त काश्मीर पुन्हा भारतात घेण्याचा तुमचा निर्धार आहे का?, असा सवाल केला होता. त्यावर, अमित शाह यांनी मजेशीर उत्तर दिले. मात्र, तेच मजेशीर उत्तर पाकिस्तानला धडकी भरवणारे ठरू शकते. म्हणूनच हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पत्रकाराच्या प्रश्नावर गृहमंत्री म्हणाले, मी मान्य करतो की पाकव्याप्त काश्मीरवर अनधिकृत ताबा आहे, पण पीओके हा भारताचा एक भाग आहे.

तो ताब्यात घेण्याबाबत निर्धार केलाय हे तुम्हाला असे जाहीरपणे कार्यक्रमात सांगेल का? असे अमित शाह यांनी म्हटले. त्यावेळी, उपस्थितांनी हसून दाद दिली. अमित शाह यांची देहबोली आणि ते उत्तर ऐकून नक्कीच पाकिस्तानला धडकी भरली असेल, भारत पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी कुठला प्लॅन तर आखत नाही ना, असा प्रश्न गृहमंत्र्यांच्या उत्तराने पाकिस्तानसह अनेकांना पडू शकतो.

काश्मीर खो-यातील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय सैन्यांनी आपली ताकद दाखवून देत दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त केली होती. केंद्रातील मोदी सरकारने हा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला धडकी भरवली. त्यामुळे, तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत तणावाचे संबंध आहेत. दुसरीकडे भारताने कलम ३७० हटवून भारतासह पाकिस्तानलाही आश्चर्याचा धक्का दिला. आता, गेल्या काही दिवसांपासून पाकव्याप्त काश्मीरवर चर्चा होत आहे.

पीओके भारताचाच
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात जम्मू आणि काश्मीरच्या मुद्यावर व कलम ३७० वर सभागृहात चर्चा झाली. जम्मू-काश्मीर पुनर्रचना आणि आरक्षण (दुरुस्ती) विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू झाली. त्यावळी गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. मी आणलेले विधेयक ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना न्याय आणि अधिकार देण्याशी संबंधित आहे. कोणत्याही समाजातील वंचितांना पुढे आणले पाहिजे, हा भारतीय राज्यघटनेचा मूळ आत्मा आहे. ७० वर्षांपासून दुर्लक्षित आणि अपमानित झालेल्या लोकांना न्याय देण्यासाठी जम्मू-काश्मीर पुनर्रचना दुरुस्ती विधेयक आणले आहे, अशी माहिती गृहमंर्त्यांनी दिली. यावेळी, अमित शहांनी कलम ३७० चा उल्लेख करत पीओके आपलाच असल्याचे ठणकावून सांगितले. त्यानंतर, आता पुन्हा एकदा अमित शहा यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत स्पष्ट विधान केले आहे.

जम्मूतील जागा वाढल्या
भारतीय निवडणूक आयोगाकडून काश्मीर विधानसभेत २ जागा काश्मिरी विस्थापितांसाठी नामांकीत केली जाईल. तसेच, पाकिस्तानने अनधिकृतपणे ताबा घेतलेल्या आपल्या काश्मीरच्या प्रदेशातून एका व्यक्तीला नामांकीत केले जाणार आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा सभागृहात काही दिवसांपूर्वीच सांगितले. आम्ही ३ जागा वाढवून त्यास कायदेशीर संरक्षण देऊन विधेयकाच्या माध्यमातून आज हे सभागृहात ठेवले आहे, असेही ते म्हणाले. तसेच, जम्मूमध्ये यापूर्वी ३७ जागा होत्या, आता ४३ जागा झाल्या आहेत. तर, काश्मीरमध्ये यापूर्वी ४६ होत्या, आता ४७ झाल्या आहेत. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील २४ जागा आपण आरक्षित ठेवल्या आहेत, कारण पीओके आपलाच आहे, असे गृहमंत्र्यांनी लोकसभेत स्पष्ट केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR