कोलकाता : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिस-या सामन्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे केएल राहुल राजकोटमध्ये खेळल्या जाणा-या सामन्यातून बाहेर गेला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सोमवारी याची पुष्टी केली. त्याचबरोबर केएल राहुलच्या जागी लखनौ सुपर जायंट्सचा खेळाडू देवदत्त पडिक्कलचा संघात समावेश करण्यात आला आहे. केएल राहुलच्या बाहेर पडल्यानंतर आता आणखी एका युवा खेळाडूला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. कर्नाटकचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलला टीम इंडियात स्थान मिळाले आहे. हा डावखुरा फलंदाज सध्या स्फोटक फॉर्ममध्ये आहे. या खेळाडूने ८ पैकी ५ सामन्यात शतके ठोकली आहेत.
राजकोटची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असली तरी केएल राहुलच्या अनुपस्थितीमुळे त्याचे खूप नुकसान होणार आहे. विराट कोहली राजकोटमध्ये पुनरागमन करेल असे पूर्वी मानले जात होते. पण आता तो संपूर्ण मालिकेतून बाहेर आहे. आता राहुलच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाची मधली फळी खूपच कमकुवत झाली आहे. श्रेयस अय्यरही मागील तीन कसोटींसाठी संघात नाही. मधल्या फळीत रजत पाटीदार आणि सरफराज खानसारखे खेळाडू आहेत. एवढेच नाही तर यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेललाही राजकोटमध्ये संधी मिळणार असल्याचे सांगितले जात आहे, ही त्याची पदार्पणाची कसोटी असेल.