विलासनगर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याने नेहमीच विविध क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली असून मान्यंवर नेत्यांच्या कार्यातून अविरतपणे, आत्मविश्वासाने विकासाची वाटचाल सुरु आहे. भविष्यात देखील अशाच पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन लातूर जिल्ह्याची वाटचाल करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी केले आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शुभेच्छा देतेवेळी सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांनी सदरील भावना व्यक्त्त केल्या. विकासरत्न विलासराव देशमुख यांनी ते ज्या खात्याचे मंत्री होते त्या खात्याचे उपविभागीय कार्यालय लातूरला आणून लातूरचा चौफेर विकास केला. विकास हा कधी थांबत नसतो ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे जे- जे नवं ते लातूरला हवं, या भावनेतून जे काही चांगले लातूर साठी करणे शक्य आहे ते करण्याचा आमचा प्रमाणिक प्रयत्न नेहमीच राहिला असल्याचे सांगून लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या मताला खूप महत्त्व असून देशाच्या हिताचे काय आहे याचा विचार व्हावा. केवळ भावनेच्या आधारे मतदारांनी मतदान न करता सद्सद विवेक बुद्धीतून मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.