सोलापूर – देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच शक्य असून ते देशाला जगात सर्वोच्च स्थान मिळवून देतील, याची खात्री विरोधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनासुध्दा आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्यातील एकजूट अभेद्य ठेवावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जुळे सोलापुरातील जामगोंडी मंगल कार्यालयात महायुतीतील भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट या तिन्ही घटक पक्षांच्या मेळाव्यात केले. अध्यक्षस्थानावरून पालकमंत्री पाटील बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार, बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, समाधान अवताडे, रणजितसिंह मोहिते-पाटील, शहाजीबापू पाटील, यशवंत माने हे आमदार,माजी खासदार अमर साबळे, राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, प्रशांत परिचारक हे माजी आमदार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार,प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, विक्रम देशमुख, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे, अमोल शिंदे, माजी नगरसेविका रोहिणी तडवळकर उपस्थित होते.
प्रारंभी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रास्ताविक करून मेळाव्याचा उद्देश सांगितला. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील,रोहिणी तडवळकर, सुवर्णा झाडे, मनीष काळजे यांच्यासह तिन्ही घटक पक्षाच्या प्रमुखांनीही मनोगत व्यक्त केले.
कुंभारी परिसरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत रे नगर फेडरेशनच्या माध्यमातून कामगारांसाठी सुमारे ३० हजार घरांचा प्रकल्प साकारत आहे. हे जगातील एक आश्चर्य असून याठिकाणी पहिल्या दिवसापासूनच वीज, दररोज २४ तास पाणी, ७ प्राथमिक शाळा, ४० अंगणवाड्या सुरू होणार आहेत. येथील नागरिकांना अन्य सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी याठिकाणी रे नगर या नावाने लवकरच नगरपालिका स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
आगामी काळात लोकसभेनंतर विधानसभा आणि गेल्या दोन-अडीच वर्षांपासून रखडलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्यांच्या सर्वच निवडणुका होतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. आता तो ही लवकरच निकाली निघेल. त्यामुळे चालू वर्षभरात सर्वच निवडणुका शक्य असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.