31.6 C
Latur
Sunday, April 27, 2025
Homeधाराशिवधाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष निवडीच्या हालचाली

धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष निवडीच्या हालचाली

धाराशिव : प्रतिनिधी
प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी पक्ष बांधणीसाठी पुढाकार घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या सुचनेनुसार प्रदेश सरचिटणीस तथा जिल्ह्याचे निरिक्षक डॉ. जितेंद्र देहाडे यांनी धाराशिव जिल्ह्याचा दौरा करून काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या तालुकानिहाय सलग तीन दिवस बैठका घेऊन पक्षाच्या कार्याचा आढावा घेतला.

धाराशिव जिल्ह्याच्या नूतन जिल्हाध्यक्षपदाची निवड होण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने जिल्ह्यातील पदाधिका-यांनी आपापल्या परिने वरिष्ठांकडे फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसल्यानंतर काँग्रेसच्या देशपातळीवरील नेत्यांनी महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जागी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी आगामी काळात होणा-या महानगरपालिका, नगर पालिका व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळावे, म्हणून पक्षबांधणीस सुरूवात केली आहे. जिल्हध्यक्षांसह अन्य पदाधिका-यांच्या निवडी करण्याच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे निरिक्षक जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत.

धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. जितेंद्र देहाडे हे निरिक्षक म्हणून आले होते. त्यांनी १० ते १२ एप्रिल दरम्यान सलग तीन दिवस जिल्ह्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या तालुकानिहाय बैठका घेऊन आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मते जाणून घेतली. दरम्यान, बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष बदलाची मागणी केली. जिल्ह्याचे निरिक्षक डॉ. देहाडे यांनी धाराशिव जिल्ह्याचा अहवाल प्रदेश कार्यालयाला सादर केला असल्याची कार्यकर्त्यांत आहे.

धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. धीरज पाटील, विद्यमान उपाध्यक्ष प्रशांत नानासाहेब पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेबूब पटेल, जिल्हा संघटक राजेंद्र शेरखाने, धाराशिव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर आदी पदाधिकारी इच्छूक असल्याचे समजते.
मराठवाडा विभागातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या निवडीत काँग्रेसचे नेते, माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेसच्या इच्छुक पदाधिका-यांनी लातूर (बाभळगाव), मुंबईच्या वा-या सुरू केल्या आहेत. अ‍ॅड. धीरज पाटील, प्रशांत पाटील यांनी आपापल्या परिने जिल्हाध्यक्ष होण्यासाठी फिल्डींग लावल्याचे दिसत आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR