धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस कार्यरत आहेत. तरीही दररोज बसस्थानकात चोरीच्या घटना घडत आहेत. चोरटे गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणा-या महिला व पुरुष प्रवाशांची रोकड, सोन्याचे दागिने अगदी सहजपणे लंपास करीत आहेत. चोरीच्या घटना रोखण्यात पोलीसांना यश आलेले नाही. दि. २९ डिसेंबर रोजी धाराशिव व तुळजापूर बसस्थानकात चोरट्यांनी महिला प्रवाशांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.
पोलिसांनी सांगितले की, अंबिका नगर लातूर येथील मोहीनी श्रीधरराव शिरुरे ह्या दि. ३० डिसेंबर रोजी धाराशिव येथे आल्या होत्या. धाराशिव बस्थानक येथून लातूर येथे जाण्यासाठी उभ्या असताना चोरट्यांनी गर्र्दीचा फायदा घेवून मोहीनी शिरुरे यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्याची अंदाजे किंमत ४५ हजार रूपये आहे. या प्रकरणी मोहीनी शिरुरे यांनी दि.३० डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुस-या घटनेत साळुंके नगर, बेंबळी रोड धाराशिव येथील अनुराधा महादेव कोकाटे ह्या दि. २९ डिसेंबर रोजी धाराशिव येथील मध्यवर्ती बसस्थानकात आल्या होत्या. त्या धाराशिव बस्थानक येथे लातूर बसमध्ये चढत असताना चोरट्याने गर्र्दीचा फायदा घेवून अनुराधा कोकाटे यांच्या पर्समधील रोख रक्कम १७ हजार रूपये चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणी अनुराधा कोकाटे यांनी दि.३० डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तिस-या घटनेत पिंपळा खुर्द ता. तुळजापूर येथील सुनंदा पंडीत कदम ह्या तुळजापूर येथे आल्या होत्या. त्या तुळजापूर मधील नविन बस्थानकात गेल्यानंतर तुळजापूर ते खडकी बस मध्ये चढत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन सुनंदा कदम यांच्या गळ््यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. त्या दागिन्यांची किंमत अंदाजे ४० हजार रूपये आहे. या प्रकरणी सुनंदा कदम यांनी दि.३० डिसेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.