मुंबई : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाल्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली असून धर्मेंद्र यांच्या निधनाच्या धक्क्यातून देओल कुटुंब अजून सावरले नाही. धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता आले नाही. देओल कुटुंबाने अत्यंत खासगी पद्धतीने धर्मेंद्र यांचे अन्त्यसंस्कार केले. येत्या ८ डिसेंबरला धर्मेंद्र यांची पहिली जयंती आहे. त्यानिमित्त देओल कुटुंंबाने चाहत्यांसाठी मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
सनी आणि बॉबी देओलने धर्मेंद्र यांची पहिली जयंती त्यांच्या आवडत्या ठिकाणी करायचे ठरवले आहे. देओल कुटुंबाच्या निकटवर्तीयाने सांगितले की, खंडाळा येथे धर्मेंद्र यांचे आवडते फार्महाऊस आहे. त्याच ठिकाणी धर्मेंद्र यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय त्यांच्या चाहत्यांनी घेतला आहे. त्यावेळी धर्मेंद्र यांच्या चाहत्यांनाही प्रवेश मिळणार असल्याची शक्यता आहे.
धर्मेंद्र यांच्या असंख्य चाहत्यांना त्यांचे अंतिम दर्शन घेता आले नाही. म्हणूनच धर्मेंद्र यांच्या जयंतीच्या दिवशी खंडाळा येथील फार्महाऊस धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्यामुळे धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना अभिनेत्याला श्रद्धांजली देता येईल. हा कोणताही विशेष फॅन इव्हेंट नसेल. धर्मेंद्र यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी चाहत्यांना फार्म हाऊसमध्ये येता येईल. फार्महाऊसवर येण्यासाठी देओल कुटुंबाकडून विशेष वाहनांची सोयही केली असेल. यासंबंधीचा तपशील लवकरच शेअर करण्यात येईल असे देओल कुटुंबाच्या निकटवर्तीयाने सांगितले.

