परभणी : साप्ताहिक वर्तमानपत्रे ही ग्रामीण भागातील पत्रकारितेचा कणा आहेत. परंतु मागील अनेक वर्षांपासून या स्थानिक वर्तमानपत्रांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे साप्ताहिकांच्या विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने गुरूवार, दि. ४ जुलै रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
परभणीत व्हाईस ऑफ मिडीया साप्ताहिक विंगच्या वतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जिल्ह्यातील पत्रकारांनी आंदोलनात सहभाग नोंदवला होता. यानंतर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे निवेदन देण्यात आले. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी शासकीय नियमाप्राणेच जाहिरातींचे वितरण करावे, जिल्हा परिषद परभणी येथील जाहिरात वितरण, प्रसिध्दी व देयकांतील अनियमितता, गैरकारभाराची चौकशी करावी, दैनिकांप्रमाणेच साप्ताहिकांनाही विशेष प्रसिध्दीच्या जाहिराती देण्यात याव्यात, सर्व दर्शनी जाहिरातींचा आकार ८०० चौसेमी करण्यात यावा, शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांना जाहिरात दरात सरसकट १०० टक्के दरवाढ देण्यात यावी, अधिस्वीकृती पत्रिका मिळण्यातील जाचक अटी रद्द कराव्यात, ज्येष्ठ पत्रकांरांचे पेन्शनचे प्रलंबित प्रस्ताव तात्काळ निकाली काढावेत, पत्रकारांची रेल्वे प्रवासातील सवलत पूर्ववत करावी, न्यूजप्रिंट पेपरवरील जीएसटी रद्द करावा, एसटी महामंडळाच्या सर्व बसमध्ये पत्रकारांना मोफत प्रवास पास लागू करावा आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
यावेळी नेमिनाथ जैन, आश्रोबा केदारे, विवेक मुंदडा, अरूण रणखांबे, रमेश नाटकर, संग्राम खेडकर, किरण स्वामी, रामेश्वर शिंदे, भूषण मोरे, दिलीप बोरूळ, रामप्रसाद ओझा, उत्तम काळे, अमोलसिंह गौतम, विलास लांडगे, राजेश रगडे, महेश कोकड, शरद कुलथे, प्रविण मोरे, खान साहेब, धोंडिबा कळंबे, संतोष कलिंदर यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती. तसेच व्हाईस ऑफ मीडिया मराठवाडा व परभणी जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिका-यांनी भेट देवून या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी गजानन देशमुख, प्रविण चौधरी, कैलास चव्हाण, रमाकांत कुलकर्णी, विजय कुलकर्णी, राजन मंगरूळकर, मारोती जुंबडे, प्रदीप कांबळे, शेख मुबारक, बाळासाहेब काळे, आनंद पोहनेरकर, नरहरी चौधरी, अनिल दाभाडकर आदींची उपस्थिती होती.
मनपा आयुक्तांची जिल्हाधिका-यांकडे तक्रार
मागील दोन वर्षांपासून मनपाकडे स्थानिक वृत्तपत्रांची जाहिर प्रगटन प्रसिध्दीची देयके प्रलंबित आहेत. ती तात्काळ अदा करावी यासाठी आज धरणे आंदोलन करून जिल्हाधिका-यांकडे निवेदनाव्दारे मनपा आयुक्तांची तक्रार करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मनपा आयुक्तांना तातडीचे पत्र देवून देयके काढण्याबाबत सुचना देण्याचे आश्वासन दिले.