चेन्नई : चेन्नई येथील एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर रंगलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंह धोनीनं पुन्हा एकदा विकेटमागे आपली चपळाई दाखवून दिली. डोळ्याची पापणी लवण्याच्या आत त्याने कमालीचे स्टंपिग करत मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमारला तंबूचा रस्ता दाखवला. वयाच्या ४३ व्या वर्षी धोनीची विकेटमागची दाखवून दिलेली चपळाई ही या दिग्गजाच्या फिटनेसचा सर्वोत्तम दर्जा दाखवून देणारी होती.
मुंबई इंडियन्सच्या संघाने आघाडीच्या विकेट्स अगदी स्वस्तात गमावल्यावर सर्वांच्या नजरा या सूर्यकुमार यादववर होत्या. नियमित कर्णधार हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करताना डाव सावरण्याची मोठी जबाबदारी त्याच्यावर पडली. तो ही भूमिका बजावतानाही दिसला. पण धोनीच्या चपळाईसमोर सूर्याचा वेग कमी पडला अन् तो स्टंपिगच्या रुपात बाद होऊन तंबूत परतला. मुंबईच्या डावातील ११ व्या षटकात नूर अहमदनं गुगली टाकली अन् त्याचा हा चेंडू पुढे येऊन मारण्याचा सूर्याचा प्रयत्न फसला. विकेट मागे धोनीनं बेल्स उडवत सूर्याला तंबूचा रस्ता दाखवला. फक्त ०.१२ सेकंदात धोनीनं त्याचा खेळ खल्लास केला. ही गोष्ट धोनीची विकेटमागची जादू आजूनही फिकी पडलेली नाही, हेच दाखवून देणारी होती.
सूर्यकुमार यादव हा एकहाती सामन्याला कलाटणी देणारा फलंदाज आहे. तिलक वर्माच्या साथीनं अर्धशतकी भागीदारी करत तो संघाला अडचणीत बाहेर काढताना दिसला. पण धोनी विकेट मागे असताना पुढे जाऊन फटका खेण्याच्या धाडस केलं अन् त्याच्या इनिंगला ब्रेक लागला. एका सेकंदाच्या आत स्टंपवरील बेल्स उडवत धोनीनं आपल्या संघाला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिली. मुंबई इंडियन्सचा कार्यवाहू कर्णधार सूर्यकुमारवर २६ चेंडूत २९ धावा करून मागे फिरण्याची वेळ आली.