नवी दिल्ली : कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने यंदाच्या हंगामाची धडाकेबाज सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात ‘आरसीबी’ला धूळ चारल्यानंतर दुस-या सामन्यात त्यांनी गुजरातच्या संघाला पराभूत केले. शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणा-या संघाचा ‘सीएसके’ समोर अजिबातच निभाव लागला नाही. अष्टपैलू शिवम दुबेचे अर्धशतक आणि रचिन रविंद्र, ऋतुराज गायकवाड यांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने २० षटकामध्ये २०६ धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना ‘जीटी’ संघाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना २० षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात १४३ धावा करता आल्या. त्यामुळे गुजरातचा ६३ धावांनी मोठा पराभव झाला. चेन्नईच्या विजयानंतर नवा कर्णधार ऋतुराज गायकवाडचे कौतुक होत असले तरी त्यांच्या संघातील खेळाडूंनी एखादी गोष्ट करण्यासाठी धोनीचीही सहमती घ्यावी लागते, असा खुलासा ‘सीएसके’च्या दीपक चहरने सांगितले.
अपील केल्यावर किंवा इतर कोणत्याही निर्णयासाठी मी ऋतुराज आणि धोनी दोघांकडेही बघतो. कारण मी खूप गोंधळात पडतो की नक्की कोणाकडे बघायचे आहे. ऋतुराज उत्तम नेतृत्व करतोय यात वादच नाही, पण परवानगी साठी धोनीकडे पाहावे लागते, असे दीपक चहर म्हणाला.
‘सीएसके’चा संघ सध्या अतिशय परिपक्व आहे. त्यांचा एकमेकांशी चांगला संवाद आहे त्यामुळे गोंधळ झाल्यावरही त्या सांभाळून घेतले जात आहेत, पण ‘सीएसके’ने लवकरात लवकर ही बाब समजून घेत ऋतुराजचा फिल्डवरचा सहभाग वाढवायला हवा. धोनीच्या निवृत्तीनंतर ऋतुराजला उत्तम कर्णधार म्हणून पुढे यायचे असेल तर ही बाब महत्त्वाची आहे, असे क्रिकेट जाणकार म्हणत आहेत.