24 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्रिपदावरून पुन्हा धुसफूस

मुख्यमंत्रिपदावरून पुन्हा धुसफूस

भंडारा/मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सत्ताधारी महायुती मजबूत झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुती एकतर्फी विजय मिळवू शकेल, असे अंदाज बांधले जातात. परंतु प्रत्यक्षात महायुतीत अंतर्गत मतभेद प्रचंड असल्याची प्रचिती वेळोवेळी येत आहे. भंडारा जिल्ह्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे कार्यकर्त्यांकडून वदवून घेतले. मात्र, याची वाच्यता होते न होते तोच याबाबतचे पडसाद लगेचच महायुतीत उमटले आणि दुसरीकडे अजित पवार गटाचे प्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांनी २०२४ मध्ये अजित पवारच मुख्यमंत्री होतील, असा दावा केला. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी महायुतीत कुणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये, असे सांगत अंतर्गत अस्वस्थतेला तोंड फोडले.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्र पक्ष देशात विजयाची पताका फडकविताना दिसत आहेत. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप देशात मजबूत स्थितीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्या-राज्यांत छोटे-छोटे पक्ष भाजपच्या गळाला लागत आहेत. महाराष्ट्रातही शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एक-एक गट भाजपसोबत गेले. महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडल्याने तुलनेने महायुती मजबूत बनली आहे. परंतु महायुतीत सर्व काही आलबेल आहे, असे म्हणता येणार नाही. कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने अस्वस्थता बाहेर पडत आहे.

भाजपच्या ब-याच वरिष्ठ नेत्यांना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चालविणे मान्य नाही. परंतु पक्षश्रेष्ठीने घेतलेल्या निर्णयामुळे सर्व नेते मौन बाळगून आहेत. मात्र, आधून-मधून अस्वस्थता बाहेर निघते. पुन्हा फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी अनेकांची इच्छा आहे. त्यामुळे कार्यक्रमात त्याबाबत बोलले जाते. बावनकुळे यांनीही कार्यकर्त्यांसमोर पक्षीय भूमिका मांडताना २०२४ मध्ये फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे उपस्थित कार्यकर्त्यांकडून वदवून घेतले. ते म्हणाले की, २०२४ मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ कोण घेणार, त्यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले.

महायुतीत टोकाचे मतभेद
एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल, असे सांगत आहेत आणि दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे फडणवीसांचे नाव वदवून घेत आहेत. त्यातच बावनकुळे यांच्या दाव्यानंतर लगेचच अजित पवार गटाचे प्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांनी २०२४ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारच मुख्यमंत्री होतील, असा दावा केला. त्यावरून पुन्हा एकदा मतभेद चव्हाट्यावर आले. त्यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी या मुद्यावरून कुणीही महायुतीत मिठाचा खडा टाकू नये, असे सुनावले. त्यामुळे तिन्ही पक्षांत आगामी काळात ताळमेळ जुळण्याची चिन्हे दिसत नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR