22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeउद्योगसुरतमधील हिरे व्यापारी पुन्हा मुंबईच्या वाटेवर!

सुरतमधील हिरे व्यापारी पुन्हा मुंबईच्या वाटेवर!

सुरत : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून १७ डिसेंबर रोजी गुजरातमध्ये सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन करण्यात आले होते. ही जगातील सर्वात मोठी कार्यालयीन इमारत आहे. जिथे ४,२०० हून अधिक हिरे व्यापार कार्यालये आहेत. आत्तापर्यंत, देशाची आर्थिक राजधानी मुंबई हिरे व्यापाराचे केंद्र मानले जात होते.

परंतु ‘सुरत डायमंड बोर्स’ उघडल्यानंतर, सुरत देखील दागिने आणि हिरे व्यापाराचे एक मोठे केंद्र म्हणून उदयास येणार असे वाटले होते. मात्र या बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रख्यात हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी हे पुन्हा आपला व्यवसाय मुंबईला स्थलांतरीत करणार असल्याचे समजते.

सूरत डायमंड बोर्सच्या निर्मितीत किरण जेम्सचे सर्वेसर्वा वल्लभभाई लखानी यांचा मोठा वाटा आहे. सुरतमध्ये शिफ्ट झाल्यानंतर किरण जेम्सच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. तसेच उत्पन्नात झालेली घट हे देखील मुख्य कारण आहे.

गैरसोयींमुळे व्यापारी हतबल

सुरत शहर आणि बोर्सचे ठिकाण सोयीचे नाही. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आहे. यासोबतच कर्मचारी स्थलांतर करण्यास तयार होत नाहीत. यामुळेच हिरे व्यापारी पुन्हा मुंबईकडे वळत आहेत.

कार्यालयांव्यतिरिक्त, डायमंड बोर्स कॅम्पसमध्ये सेफ डिपॉझिट व्हॉल्ट, कॉन्फरन्स हॉल, मल्टीपर्पज हॉल, रेस्टॉरंट्स, बँका, कस्टम क्लिअरन्स हाऊस, कन्व्हेन्शन सेंटर, प्रशिक्षण केंद्रे आणि क्लब यांसारख्या सुविधा आहेत. गेल्या महिन्यात अनेक हिरे व्यापा-यांनी येथे आपली कार्यालये सुरू केली होती मात्र व्यापा-यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

सुरत डायमंड बोर्सचे नाव यावर्षी ऑगस्टमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. ही इमारत ३५.५४ एकरमध्ये पसरलेली आहे. त्याचे बांधलेले क्षेत्र ६७ लाख चौरस फूट आहे. यापूर्वी जगातील सर्वात मोठ्या कार्यालयीन इमारतीचा विक्रम अमेरिकेच्या पेंटागॉनकडे होता. पेंटागॉनचे क्षेत्र ६५ लाख स्क्वेअर फूट आहे.

सुरतमध्ये बांधलेल्या या मेगास्ट्रक्चरमध्ये ९ ग्राउंड टॉवर आणि १५ मजले आहेत. यामध्ये ३०० चौरस फूट ते १ लाख चौरस फुटांपर्यंतच्या ४,५०० हून अधिक कार्यालयीन जागा आहेत. या इमारतीला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून प्लॅटिनम मानांकन मिळाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR