जळगाव : अमळनेर येथे २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. हे संमेलन हायटेक असणार आहे. अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर साहित्य संमेलनात करण्यात येणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करण्यात येणार आहे. थोडक्यात मराठी साहित्य संमेलनाच्या पारंपारिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला आहे.
साहित्य संमेलनाशी निगडीत प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथमच ‘चॅटबॉट’चा वापर करण्यात येणार आहे. तसेच ‘क्यूआर कोड’ सारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर संमेलनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. याशिवाय संमेलनाच्या प्रसिध्दीसाठी रिल्स, व्हिडीओ व सोशल मीडियाचाही प्रभावीपणे वापरण्यात येत आहे.
संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. रवींद्र शोभणे भुषविणार असून संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाला केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी सांगितले.