35.5 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी

भाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी

मुंबई : प्रतिनिधी
आपल्यासोबत आलेल्या सर्व खासदारांना त्यांचे मतदारसंघ मिळालेच पाहिजेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाम भूमिका घेतली असली तरी भाजपने नाशिकवरील दावा कायम ठेवला आहे. तसेच संभाजीनगर व रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ सोडण्यासही भाजपने नकार दिला असून शिवसेनेवर ३ विद्यमान खासदारांना उमेदवारी देऊ नये, यासाठी दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. यामुळे महायुतीतील वातावरण तापले आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण उभारले तेव्हा शिवसेनेच्या ४० आमदार व १३ खासदारांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळेच शिंदे यांच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्य-बाण चिन्हे मिळाले. शिंदे यांच्यासोबत आलेल्या खासदार, आमदारांना त्यांचे मतदारसंघ सोडले जातील, याशिवाय उर्वरित जागाचे वाटप होईल, असे तेव्हा सांगण्यात आले होते; पण लोकसभा निवडणुकीत सोबत आलेल्या खासदारांच्या जागा राखताना शिंदेंच्या शिवसेनेची दमछाक होत आहे. नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे शिंदे यांच्या सोबत असले तरी या जागेवर आधी भाजपने व नंतर राष्ट्रवादीने हक्क सांगितल्याने शिंदेंची अडचण झाली आहे. गेले आठवडाभर चर्चेचे गु-हाळ सुरू असेल तरी हा पेच कायम आहे.

संभाजीनगर व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या २ मतदारसंघांची मागणी शिवसेनेने केली होती; पण त्या बाबतही अजून निर्णय झालेला नाही. शिंदेंच्या शिवसेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत; पण हा मतदारसंघ भाजपचा आहे व भाजपकडेच राहील, इतरांनी इकडे लुडबुड करू नये, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठणकावले आहे. ही जागा भाजपकडेच राहील व पक्ष सांगेल ती व्यक्ती उमेदवार असेल. पक्षाने मला आदेश दिला तर मी निवडणूक लढवायला तयार असल्याचे राणे यांनी सांगितले.

हेमंत पाटील, भावना गवळी यांची उमेदवारी अडचणीत
शिंदेंच्या शिवसेनेने हिंगोली लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे; पण भाजपाने केलेल्या सर्वेक्षणानुसार त्यांचे पुन्हा निवडून येणे कठीण आहे. त्यामुळे त्यांना बदलावे, असे भाजपचे म्हणणे आहे. यामुळे शिंदे गटाकडून पर्यायी उमेदवाराची चाचपणी सुरू झाली आहे. भाजपच्या दबावामुळे उमेदवार बदलला जाण्याची कुणकुण लागल्याने हेमंत पाटील आक्रमक झाले आहेत. त्यांच्या समर्थकांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ठिय्या मारला आहे. वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनीही आपली उमेदवारी राखण्यासाठी मुंबईत तळ ठोकला आहे. नाशिकचे हेमंत गोडसे मुंबईत बसून आहेत.

सिंधुदुर्ग-रत्नागिरीवर भाजपचाच दावा
नारायण राणे यांची सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेसाठी उमेदवारी पक्की झाल्याचे वृत्त आहे. मी हायकमांडने दिलेला मेसेज उघडपणे सांगणार नाही. पण वरून आदेश आला तर लढायला तयार आहे, असे सांगत राणे यांनी निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले. राणे यांना भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचाराला कामाला लागण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे.

ठाकरे गटाची टोलेबाजी
महायुतीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच व मुख्यमंत्री शिंदे यांच्या कोंडीवरून ठाकरे गटाने त्यांच्यावर शेलकी टीका करण्याची संधी साधली. रामटेकमध्ये गद्दाराला तिकिट नाकारण्यात आले. शिंदेंसोबत गेलेल्या ४० आमदारांनाही आता विचार करावा, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला तर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांनी बोलल्याप्रमाणे त्यांच्या सोबत गेलेल्या १३ खासदारांच्या जागा तरी राखाव्यात, असा टोला लगावला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनीही शिंदेंसोबतच्या खासदार, आमदारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR