35.5 C
Latur
Tuesday, April 16, 2024
Homeसोलापूररमेश कदम एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढणार?

रमेश कदम एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढणार?

सोलापूर : एकीकडे वंचितच्या उमेदवाराचा फटका काँग्रेसला बसणार अशी चर्चा सुरू असताना आता एमआयएम पक्षानेदेखील या मतदारसंघात आपला उमेदवार उतरवण्याची तयारी केली आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात मोहोळचे माजी आमदार रमेश कदम हे एमआयएमच्या तिकिटावर निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

गेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी वंचित आणि एमआयएमची युती असल्याने या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांनी जवळपास १.७० लाख मते घेतली होती. त्या निवडणुकीत सुशिलकुमार शिंदेंचा दीड लाख मतांनी पराभव झाला होता. आताही जर वंचित आणि एमआयएमच्या उमेदवारांनी जास्त मते घेतली तर ती काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंंसाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. रमेश कदम हे २०१४ साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळमधून निवडून आले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी मागेल त्याला टँकर, मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्या ठिकाणी रस्ता दिल्याने चांगलेच लोकप्रिय झाले.

आण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळामध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. रमेश कदम हे तुरुंगातही गेल्यानंतर चांगलेच वादग्रस्त ठरले होते. तुरुंगात असताना त्यांनी पोलिसांना केलेली शिविगाळ असो वा वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत. रमेश कदम हे जवळपास आठ वर्षे तुरुंगात होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले. रमेश कदम हे मांतग समाजातून असून या समाजाची मोठी संख्या आहे. तसेच मोहोळ आणि पंढरपूर परिसरात रमेश कदम यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तुरुंगात असताना ज्या ज्या वेळी ते जामीनातून बाहेर यायचे त्या त्यावेळी त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी व्हायची. आताही त्यांचे मोठ्या धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणारा पहिला आमदार
राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राजीनामा देणारे रमेश कदम हे मराठा सोडून इतर समाजातील पहिलेच आमदार ठरले. त्यामुळे मराठा समाजातूनही त्यांना पांिठबा मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच एमआयएमची उमेदवारी त्यांना जर मिळाली तर मुस्लिम मतांनी जर रमेश कदम यांना साथ दिली तर ते मोठ्या प्रमाणात मतं घेऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पहिला वंचितचा उमेदवार आणि आता रमेश कदम यांच्या उमेदवारीची चर्चा, यामुळे सोलापुरातील राजकीय गणिते नक्कीच बदलण्याची शक्यता आहे. याचा फटका मात्र काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना मोठ्या प्रमाणात बसणार असे दिसत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR