जिंतूर : विद्या व्हॅली शाळेच्या वतीने आषाढी वारी निमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतून ही दिंडी अण्णाभाऊ साठे चौक, नगर परिषद या प्रमुख मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत काढण्यात आली. या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्मिणी, संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपान, संत मुक्ताबाई, संत नामदेव, संत तुकाराम यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी साकारल्या होत्या. वारक-यांच्या पारंपारीक वेषातील विद्यार्थी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. या दिंडीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता.
वृक्षदिंडीच्या माध्यमातून निसर्गाची जोपासना करण्यासाठी प्लॅस्टिक व इतर निसर्गास घातक वस्तूंचे वापर कमी व्हावे याविषयी विविध फलक घेऊन विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. या वारकरी पारंपारिक संस्कृतीच्या पावल्यांच्या माध्यमातून मुलांनी समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न केला. दिंडीमध्ये पालखी विणेकरी, चोपदार, तुळशी वृंदावन झेंडेकरी आणि शाळेतील सर्व विद्यार्थी वारकरी वेशभूषेमध्ये ज्ञानोबा तुकोबा जयघोष करत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात गोल रिंगण करून पाऊल्यांचे विविध प्रकार व आरत्या घेतल्या. शाळेच्या अध्यक्षा प्रिया देशमुख व मुख्याध्यापिका रजिया पठाण यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानिमित्त ह.भ.प. नवनाथ महाराज जगताप व शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्या व्हॅलीच्या दिंडीने सर्व जिंतूरकरांचे लक्ष वेधून घेतले.