पुणे : बारामती नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार येत्या शनिवारी बारामती दौ-यावर आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बारामतीत एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान त्यांना शरद पवार यांनी फोन करून त्यांच्या घरी जेवणाचे निमंत्रण दिले. आता शरद पवारांचे निमंत्रण स्वीकारले जाणार का, हे पाहावे लागेल.
बारामतीत येत्या शनिवारी शासकीय कार्यक्रम असतानाही, राज्यसभेचे खासदार असलेल्या शरद पवारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही. मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या घरी जेवणाचे आमंत्रण दिले. शरद पवारांची ही डिनर डिप्लोमसी महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणते वळण देते याकडे सा-यांचे लक्ष लागले आहे.
बारामतीला जेव्हा कुणीही येते त्यावेळी शरद पवार हे आवर्जून त्यांना घरी बोलावतात, अतिथी देवो भव: ही आमची संस्कृती असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. राज्याचे मुख्यमंत्री जर बारामतीला येत असतील तर त्यांना बोलावणे ही आमची संस्कृती असल्याचेही त्या म्हणाल्या.
शरद पवारांना निमंत्रण नाही
विद्या प्रतिष्ठान येथील १२ एकराच्या मैदानावर बारामती रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत. मात्र या कार्यक्रमाला शरद पवारांना निमंत्रण देण्यात आले नसल्याची माहिती समोर आली आहे. येत्या २ मार्च रोजी बारामतीमध्ये रोजगार मेळावा होणार असून त्या कार्यक्रमाला खासदार अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. खासदार शरद पवारांचे नाव मात्र वगळण्यात आल्याने त्यावरून राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे यांना मात्र निमंत्रण देण्यात आले आहे.