22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रदुधात भेसळ केल्यास थेट फाशीची शिक्षा

दुधात भेसळ केल्यास थेट फाशीची शिक्षा

कायद्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार : अजित पवार

नागपूर : राज्यात दूधदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतक-यांकडून आंदोलने केली जात आहेत. शेतक-यांच्या या मागणीबाबत राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे.

तसेच दुधात भेसळ करणा-यांविरुद्ध कडक कारवाईसाठी कायदा आणण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन त्यांच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे दूध भेसळ रोखण्यासाठी भेसळ करणा-या व्यक्तींविरुद्ध फाशीची तरतूद करण्याचा कायदा तत्कालीन राज्य शासनाने करून केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र त्यास अद्याप राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नसल्याने याबाबत पाठपुरावा करण्यात येणार आहे,’ अशी माहिती अजित पवार यांनी विधिमंडळात दिली.

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘दूध अथवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन प्रामुख्याने लहान मुले करतात. अशा पदार्थांमध्ये भेसळ करणे योग्य नाही. त्यामुळे अशा व्यक्तींविरुद्ध फाशीची तरतूद करण्याचा कायदा तत्कालीन राज्य शासनाने केला होता. त्यास अद्याप राष्ट्रपतींची मान्यता मिळालेली नसल्याने त्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.’

आमदार हरिभाऊ बागडे यांनी दूध उत्पादकांना मदत करण्यासंदर्भातील उपाययोजना करण्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अ‍ॅड. राहुल कुल, राजेश टोपे आदींनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला होता.

अधिवेशनापूर्वी मदतीबाबत निर्णय घेणार
दूध उत्पादकांकडून करण्यात येत असलेल्या मागण्यांबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिले आहे. दूध उत्पादकांना मदत करण्याची शासनाची भूमिका असून अधिवेशन संपण्यापूर्वी त्यांना अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, तसेच अतिरिक्त भुकटी, बटर निर्यातीसाठी देखील प्रयत्न करण्यात येतील, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबतच्या उत्तरात अधिक माहिती देताना स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR