19.8 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्रनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून थेट हस्तक्षेप

निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून थेट हस्तक्षेप

विदर्भातील ८ उमेदवारांची नागपूर खंडपीठात याचिका

नागपूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून हस्तक्षेप करण्यात आल्याचा आरोप करून काँग्रेसच्या विदर्भातील ८ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. निवडणूक रद्द करून ती नव्याने घेण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवडणुकीला आव्हानसुद्धा देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून लढलेले काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे, दक्षिण नागपूरचे उमेदवार गिरीश पांडव, अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील उमेदवार तसेच माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, सुभाष धोटे, शेखर शेंडे, संतोषसिंग रावत, सतीश वारजूरकर यांनी ही याचिका सादर केली. लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला होता. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठी आशा होती. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीची सत्ता येईल, असे दावेही काँग्रेसच्या नेत्यांमार्फत केले जात होते. मात्र, निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. काँग्रेसचे फक्त १६ आमदार निवडून आले आणि अनेक दिग्गज पराभूत झाले. पहिल्या निवडणुकीपासून कधीच पराभूत झाले नसलेले बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांचा यात समावेश आहे. त्यामुळे अनेकांना निवडणुकीच्या निकालावर शंका आहे.

कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही
निवडणुकीत कायदेशीर प्रक्रियेचे पालन करावे लागते. मात्र, ईव्हीएमने निवडणूक घेण्यापूर्वी या कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता निवडणूक आयोगाने केली नाही. ईव्हीएमने निवडणूक घ्यायची असल्यास काही निकष देण्यात आले होते. याची कारणेही स्पष्ट करावी लागतात. तेसुद्धा केले नाही. एवढेच नव्हे तर ईव्हीएमने निवडणूक घेण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा काढले नसल्याचे याचिकाकर्ते गुडधे यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR