मोहोळ : स्वच्छतेबाबत नगरपरिषदेकडून असलेल्या उदासीनतेमुळे शहरात कच-याचे बिगारे, तुंबलेल्या गटारी, त्यातून घाणीचे साम्राज्य वाढले आहे. डासांच्या त्रासामुळे नागरिक अक्षरश: हैराण झाले आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील सर्व नागरी वस्ती परिसरात पंपाद्वारे फवारणी करून पावडर टाकण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
शहराची वाढती लोकसंख्या पाहता प्रत्येक प्रभागात तुंबलेल्या, फुटलेल्या गटारी व त्यातून वाहणारे घाण पाणी, साठलेल्या अवस्थेत घाणीचे साम्राज्य आहे. परिणामी डासांचे प्रमाण वाढले असून शहरात डासांच्या उपद्रवामुळे थंडी, ताप, खोकला या लक्षणांमुळे डेंग्यूसदृश रोगाच्या साथीचे प्रमाण वाढले आहेत. लहान मुले, बयोवृद्ध नागरिकांची दवाखान्यात गर्दी होत आहे. साथीच्या रोगांमुळे दवाखान्याचे पायरी चढण्याची वेळ येत आहे. दुसरीकडे नगरपरिषद प्रशासन नागरिकांना डेंग्यू किंवा अन्य रोगांची लागण होण्याची जणू वाटच पाहत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
स्वच्छता कर भरून आर्थिक ओझ्याने कंबरडे मोडलेल्या मोहोळकरांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रत्येक प्रभागात तुंबलेल्या गटारी व त्यातून वाहनारे घाण पाणी साठलेल्या अवस्थेत सगळीकडे पसरत आहे. याबाबत नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने शहरात तत्काळ स्वच्छता मोहीम राबवून पावसाळ्यामुळे उगवलेली झाडेझुडुपे, ठिकठिकाणी साचलेल्या गटारी रिकाम्या करणे, पडलेले कच-याचे ढिगारे उचलणे, सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरी वस्ती परिसरात फॉगिंग पंपाद्वारे फवारणी करून जंतुनाशक पावडर टाकण्याचे उपक्रम हाती घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
रस्त्यांवर घाण पाणी सोडून नागरिकांची गैरसोय करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचीही मागणी केली जात आहे. निवडणुकीपुरता स्वच्छतेचा नारा देऊन नागरिकांची दिशाभूल केली जाते. वास्तवात अनेक प्रभागांमध्ये गटारीचे घाण पाणी रस्त्यांवर वाहत आहे. ज्ञानमंदिराच्या ठिकाणी कच-याचे ढीग, तुंबलेल्या गटारी असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपरिषद प्रशासनाने तत्काळ उपायोजना राबवून लोकवस्तीत वाढलेली झाडेझुडपे काढून डासांच्या प्रादुर्भावापासून नागरिकांची सुटका केली, तर आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. आरोग्य सुविधांसाठी नगरपरिषदेकडून मोहोळ शहरातील नागरिकांकडून लाखो रुपयांचा कर गोळा केला जातो; मात्र त्या कराच्या बदल्यात मोहोळकरांच्या माथी कायम सुविधांची वानवाच आहे. त्यामुळे मोहोळ नगरपरिषदेचा आरोग्य विभाग नेमका करतो तरी काय, असा संतप्त प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.