15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeमहाराष्ट्रशरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलावरून मतभेद

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलावरून मतभेद

उघडपणे २ भूमिका समोर

मुंबई : गेल्या २ दिवसांपासून शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक सुरू आहे. या बैठकीत पक्ष संघटनेत बदल करावेत अशी मागणी पुढे येत असून त्यात प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही बदलले जावे असे म्हटले जात आहे. त्यात पक्ष संघटनेतील या बदलावरून राष्ट्रवादीतील २ मतप्रवाह समोर आले आहेत. त्यातील एका गटाला पक्ष संघटनेत बदलाची गरज नाही असे वाटते तर काहींनी नव्या लोकांना संधी द्यावी अशी मागणी केली आहे.

विधानसभेत पक्षाला फटका बसल्यानंतर पक्ष संघटनेत बदलाचे वारे वाहू लागले आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षातील नेते, पदाधिका-यांची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी आगामी काळात पक्ष संघटनेत बदल केले जातील हे संकेत शरद पवारांनी दिले आहेत. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरू आहे. त्यातच रोहित पवार यांनीही अप्रत्यक्षपणे प्रदेशाध्यक्ष बदलाची गरज असल्याचे सूचवले आहे.

रोहित पवार म्हणाले की, अनुभव हा महत्त्वाचा आहे परंतु संघटनेत जो काम करतोय त्याला कुठलीतरी महत्त्वाची जबाबदारी दिली गेली आणि त्यात नेत्यांचे मार्गदर्शन पदाधिकारी, कार्यकर्त्याला मिळू शकेल. सामान्य कुटुंबातील कुणी पदावर आले तर त्याचे स्वागतच सगळे करतील पण शेवटी निर्णय शरद पवारांचा आहे असे त्यांनी सांगितले. तर ज्या पदाधिका-यांचे २-३ टर्म झालेत. संघटनेच्या संविधानानुसार ३ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊनही अनेकजण पदावर आहेत. त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे असे विधान करत पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी करत जयंत पाटलांनीही राजीनामा द्यावा अशी अप्रत्यक्षपणे मागणी केली आहे.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बदलणार अशा बातम्या वृत्तपत्रात वाचून आम्हाला हसू येते. पक्षात आम्ही काम करतोय, आम्हाला जास्त माहिती असेल. कार्यकर्त्यांमध्ये थोडी मरगळ आली होती. शरद पवारांना पाहिले आणि त्यांचे शब्द कानावर पडले त्यासाठी ही बैठक होती. जेवढी मेहनत जयंत पाटील यांनी पक्षासाठी केली, पक्षाला वेळ दिला. यश-अपयशावर अध्यक्षपद ठरत नाही. लोकसभेत यश मिळाले ते जयंत पाटलांमुळे आणि सहा महिन्यांनी विधानसभेला अपयश मिळाले ते जयंत पाटलांमुळे, म्हणून त्यांना पदावरून काढून टाकायचे हे कुठले नवीन गणित आहे असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR