20.7 C
Latur
Sunday, December 8, 2024
Homeलातूरजनतेचे मुद्दे गायब, महागाईला बगल; योजनांभोवतीच प्रचार मोहीम

जनतेचे मुद्दे गायब, महागाईला बगल; योजनांभोवतीच प्रचार मोहीम

लातूर : निवडणूक डेस्क
लोकसभेला संविधानात बदल, आरक्षणाला धोका असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केल्याने महाराष्ट्रात महायुतीला फटका बसला. परंतु, विधानसभा निवडणुकीत मात्र लोकसभेतील बहुतांश मुद्दे गायब झाले आहेत. यावेळी लाडकी बहीण, लाडका भाऊ आणि लाडका शेतकरी या मुद्यांभोवतीच निवडणुकीची प्रचार मोहीम फिरत आहे.

महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला भाव या मुद्यांना मात्र सोयीस्करपणे बगल देण्यात आल्याचे दिसून येते. एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेकीमुळे मतदारांची मात्र चांगलीच करमणूक होत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राममंदिर, कलम ३७०, रस्ते, मेट्रोचे जाळे या मुद्यांवर जोर दिला गेला. तसेच विरोधकांना देशद्रोही मंडळींचा समूह म्हणून हिणविले होते. तर इंडिया आघाडीकडून संविधानाला धोका महागाई, बेरोजगारी, आरक्षण संपविणार, उद्योगधंदे गुजरातला पळविले, मणिपूर या मुद्यांवरून प्रचाराची राळ उडविण्यात आली होती. त्यात संविधानाला धोका या मुद्यावर आघाडीने अधिक भर दिल्याने महायुती बॅकफूटवर गेली होती.

विधानसभा निवडणुकीत यावेळी भाजपकडून लाडक्या बहिणींना दरमहा दीड हजार रुपयांऐवजी २१०० रुपये देणार, युवकांच्या हाताला काम, वृद्धांच्या पेन्शनमध्ये वाढ, महाराष्ट्रात गुंतवणूक वाढली, शेतकरी सन्मान निधीत वाढ, महिलांना एस.टी. प्रवासात सवलत, ओबीसी, एससी, एसटी आरक्षणाला धोका या मुद्यांवर प्रचारात जोर देण्यात येत आहे. महाविकास आघाडीनेही त्याला उत्तर म्हणून लाडक्या बहिणींना दरमहा तीन हजार रुपये देणार, जातनिहाय जनगणना, महिलांना मोफत प्रवास, भ्रष्टाचार, जाती-धर्मात तेढ, आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे नेणार हे मुद्दे मतदारांसमोर मांडले आहेत.

मुख्य मुद्द्यांवर कोणीच बोलेना
महायुती व महाविकास आघाडीकडून मतदारांना आपल्याकडे खेचून घेण्यासाठी नवनवे मुद्दे उकरून काढले जात आहेत. परंतु, या सर्वांमध्ये वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, भरती परीक्षांतील घोटाळे, शेतकरी आत्महत्या, आरोग्य व्यवस्था अशा जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयांना मात्र कुणीही हात घातला नाही. उलट, एकमेकांवर वैयक्तिक चिखलफेक करण्यातच धन्यता मानली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR