बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. या हत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाय या हत्येप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.
अशातच आता एसआयटीच्या तपासात संतोष देशमुखांच्या हत्येबाबत मोठा आणि धक्कादायक पुरावा समोर आला आहे. यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी गुन्हेगारांनी कोणकोणती हत्यारे वापरली होती याबाबतची माहिती तपासातून समोर आली आहे. त्यानुसार, आरोपींनी हत्येसाठी एक ४१ इंच लांबीचा गॅस सिलेंडर पाईप, ज्याची एक बाजू गोलाकार केलेली आणि त्यावर काळ्या दो-याने गुंडाळून मूठ तयार केलेली आहे.
याशिवाय एक लोखंडी अर्धा इंच पाईप आणि त्यात लोखंडी तारेचे पाच क्लच वायर वापरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, अद्याप सीआयडीला तलवारीसारखी धारदार शस्त्रे, चार लोखंडी रॉड, कोयता, फायटर ही हत्यारे अद्याप सापडलेली नाहीत. त्यामुळे ती आरोपींनी नेमकी कुठे टाकली याबाबतचा तपास सुरू आहे.
कराडवर आयसीयूमध्ये उपचार
तर देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असा आरोप होत असलेला आणि खंडणी प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कराडचे मेडिकल चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ताप, सर्दी, खोकला असल्याचे सांगितले होते. मात्र रात्री जेवणानंतर त्याच्या पोटात दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
कृष्णा आंधळे अद्याप फरारच
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे अखेर बीड पोलिसांनी बुधवारी त्याला फरार घोषित केले आहे. पोलिसांनी आंधळेचा महाराष्ट्रासह शेजारील राज्यात देखील शोध सुरू केला आहे. तसेच त्याला अटक करण्यासाठी आवश्यक माहिती देणा-यांसाठी बक्षीस देखील जाहीर केले आहे. मात्र, तरीही अद्याप कृष्णा आंधळेचा ठावठिकाणा पोलिसांना समजला नाही, त्यामुळे देशमुख कुटुंबियांकडून पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केली जात आहे.