सोलापूर : सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत नाराजीनाट्य पाहायला मिळालं. हर्षवर्धन पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यासमोरच महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची नाराजी दिसली. मंचावर खुर्ची नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष तौफिक शेख बैठकीतून संतापून निघून गेले. तर पक्षामधून आम्हाला कोणत्याही पद्धतीची सन्मानाची वागणूक मिळत नाही. त्यामुळे बैठकीतून निघून जात असल्याची प्रतिक्रिया तौफिक शेख यांनी दिली. तर महिला पदाधिकाऱ्यांकडूनही हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्या समोरच मोठमोठ्याने ओरडून नाराजी व्यक्त केली.
महिला पदाधिकाऱ्यांना देखील व्यासपीठावर स्थान दिले नाही. त्याचबरोबर बैठकीबाबत आम्हाला कल्पना देखील दिली जात नाही असा आरोप महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, नेत्यांसमोरच महिला आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची नाराजी दिसल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळं सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील कुजबूज बाहेर आली आहे. याची सध्या सर्वत्र चर्चा झाली. दरम्यान, या बैठकीला हर्षवर्धन पाटील आणि शशिकांत शिंदे यांच्यासोबत माढा तालुक्याचे आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील, ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे, बळीरामकाका साठे यांच्यासह शहरातील महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.