नागपूर : (प्रतिनिधी) मराठा आरक्षणावरून राज्यात प्रक्षोभ आहे. सरकारने आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेला सहमती दिली. दुपारच्या सत्रात विधानसभा अध्यक्षांनी सोमवारी अवकाळी पाऊस व मंगळवारी मराठा आरक्षणावर चर्चा घेतली जाईल असे सांगितले.
अशोक चव्हाण यांनी आज विधानसभेत मराठा आरक्षणाचा विषय उपस्थित केला. राज्यभर मराठा आरक्षणासंदर्भात मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ आहे व सरकारमधील एका जबाबदार मंर्त्याने आश्वासन दिले होते की विधानसभेत चर्चा घडवून मराठा आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करू असे सांगितले होते. ही चर्चा कधी होणार आहे ? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंर्त्यांनी दिले आहे. राज्यभर आंदोलन सुरू आहे. केव्हा व काय निर्णय घेणार हे कळले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चर्चा झाली पाहिजे अशीच राज्य सरकारचीही भूमिका असल्याचे सांगितले. विधानरिषदेत चर्चा घेण्याचे ठरले आहे. या ही सभागृहात केव्हा चर्चा घ्यायची यावर सर्व गटनेत्यांशी बोलून अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार मंगळवारी ही चर्चा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.