बीड : मी दलबदलू नाही, मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. ज्या पक्षांनी आपल्याला संधी दिली त्या पक्षाशी गद्दारी करणा-यांपैकी मी नाही. नाराजी जरुर आहे पण पक्ष सोडणार नाही असे म्हणत बीडच्या गेवराई येथील भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्याचे वृत्त आहे.
आमदार लक्ष्मण पवार म्हणाले की, राजकारण आता पाहिल्यासारखे राहिले नसल्याने किळस येत आहे. मी किंवा माझ्या कुटुंबियातील कोणताच सदस्य आमदारकी लढविणार नाही, अशी खदखद बीडच्या गेवराईचे भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. सलग दोन वेळा भाजपकडून आमदार झालेले लक्ष्मण पवार हे बीडच्या गेवराईचे विधानसभा सदस्य आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल गेवराईत पक्षातंराच्या वावड्या उठत असताना त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मी दलबदलू नाही कुठल्याही पक्षात जाणार नाही. पक्षावर जरुर नाराज आहे, वेळ आल्यावर माझे म्हणणे पक्षासमोर मांडेन परंतू सध्याच्या राजकारणाची किळस येत आहे.
लोकसभा निवडणुकीत माझे ऐकले नाही. मी चांगला तहसीलदार, पोलिस निरीक्षक आणि बीडीओ मागितला, पण तो देण्यात आला नाही. पालकमंत्रीही ऐकत नाहीत. मग राजकारण तरी करायचे कशाला? पदावर असताना जनतेचे कामे होणार नसल्याने येणा-या निवडणुकीत मी किंवा माझ्या कुटुंबीयातील कोणताच सदस्य विधानसभेची निवडणूक लढविणार नाही अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आमदार लक्ष्मण पवार यांनी पालकमंत्री तथा राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोष व्यक्त केला आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात पवारांची ताकद आहे असे असूनही त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे.