नागपूर : निधी वाटपाच्या संदर्भात विरोधी पक्षातील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांना सर्वांना सामान निधी मिळत नसल्याबाबत काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी दिली आहे. जर याबाबत न्याय मिळाला नाही तर न्यायालयात धाव घेणार असल्याचेही काही काँग्रेस आमदारांनी म्हटले आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरच नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षातील मोजक्याच वरिष्ठ नेत्यांना निधी मिळाल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
विरोधी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जर आपल्याच पक्षातील सर्व आमदारांना समसमान निधी वाटप होत नसेल तर तो निधी घेऊ नये, अशी भूमिकाही आव्हाड यांनी मांडली आहे. आपल्याच कळपातील काही जणांना निधी मिळते आणि काही जणांना एक रुपया सुद्धा जर निधी मिळत नसेल तर सरकार विरोधात लढाई लढायची कशी? असा जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. जर काँग्रेस या संदर्भात कोर्टात जात असेल तर मीही कोर्टात जाईन असे जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या दिशा-निर्देशानुसार सर्व आमदारांना त्या चौकटीतच निधी दिला जातो. जर चुकून एखादा आमदार राहिला असेल तर याबाबत माहिती घेऊन निधी दिला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.